पवना धरणाचं पाणी वाढलं; सध्यातरी पाणी कपात नाही! पावसामुळे पाणीपातळीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 01:29 PM2024-07-06T13:29:51+5:302024-07-06T13:30:02+5:30
धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात टळली आहे...
पिंपरी :पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तूर्तास तरी पाणी कपात टळली आहे.
शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर जास्त आहे. शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. साडेचार वर्षे झाले तरी शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. धरण परिसरात १ जूनपासून २९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पाणीसाठा १९.०१ टक्के आहे. हा साठा २० जुलैपर्यंत पुरेल एवढाच आहे. गेल्या वर्षी जुलैच्या सुरुवातीला २०.१६ टक्के पाणीसाठा होता. तर ४२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी ३४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज...
मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जर पाऊस चांगला राहिला, तर शहरावर असलेली पाणी कपातीची टांगती तलवार बाजूला होणार आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे तक्रारींत वाढ...
पिंपरी-चिंचवडला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील साडेचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचा लोकसंख्या वाढीचा वेग आणि भविष्यातील सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन पालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. परंतु वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिवसाला ६१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा....
पालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) १५, असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते.
धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. जुलै महिन्यात पाण्याची कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तूर्तास पाणी कपातीची आवश्यकता नाही. जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीनुसार पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका