पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा विस्कळीतच, कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:28 AM2024-07-03T09:28:40+5:302024-07-03T09:29:19+5:30
अजूनही पेठांमधील काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत...
पुणे : खडकवासला जॅकवेल येथे शॉर्ट सर्किट झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह पूर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यानंतर अजूनही पेठांमधील काही भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होण्याच्या एक दिवस आधी खडकवासला जॅकवेल येथे शॉर्ट सर्किट झाल्याने धरणातून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. महापालिकेने तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरू केला. शहरात लाखो वारकरी असतानाही गुरुवार पेठ, घोरपडे पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, गंज पेठ भागात पाणी कमी दाबाने होते. आज पालखी पुण्यातून बाहेर गेल्यानंतरही काही भागात पाण्याच्या तक्रारी होत्या.