लग्न जुळलं! तारीख ठरली, नवरीच्या डोक्यात मात्र भलतंच, होणारा नवरा नापसंत म्हणून मर्डरची सुपारी..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:59 IST2025-04-02T15:49:10+5:302025-04-02T15:59:17+5:30
नवरीने त्याला संपवण्यासाठी ५ जणांना दीड लाखाची सुपारी ही दिली, आणि त्याला कसं संपवायचं याचा प्लॅन देखील रचला

लग्न जुळलं! तारीख ठरली, नवरीच्या डोक्यात मात्र भलतंच, होणारा नवरा नापसंत म्हणून मर्डरची सुपारी..
किरण शिंदे
पुणे: सागर कदम आणि मयुरी दांडगे यांच्या कुटुंबीयांनी दोघांचं लग्न ठरवलं. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. लग्नाची तारीख ही ठरली. आणि त्यानंतर भावी वर वधूंनी प्री-वेडिंग फोटोशूटही केलं. फोटोशूट अगदी जोरदार झालं. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं. लवकरच लग्न होणार असल्याने सागर कदम आनंदी होता. मात्र मयुरीच्या मनात काही वेगळंच होतं. होणारा नवरा पसंत नसल्याने भयानक कट रचला होता.
नवरा मुलगा पसंत नसल्याची रूख रूख मयुरीच्या मनात होती. आणि तिने भयानक कट रचला. लग्नाच्या आधीच सागरला ठार मारण्याचे तिला ठरवलं. यासाठी तिने पाच जणांना दीड लाखाची सुपारी ही दिली. आणि त्याला कसं संपवायचं याचा प्लॅन देखील रचला. मयुरी गोड बोलून सागरकडे चित्रपट पाहण्याचा आग्रह धरला. होणाऱ्या बायकोचा आग्रह सागरने टाळला नाही. दोघांनीही जोडीने चित्रपट पाहिला. पिच्चर संपल्यानंतर दोघेही घरी निघाले. मयुरीला मामाच्या घरी सोडून सागर आपल्या घराकडे निघाला होता. यावेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खामगाव फाट्यावर चार चाकी कार मधून आलेल्या चौघांनी सागरला अडवलं. आणि त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मयुरी सोबत लग्न केल्यास तर याद राख अशी धमकीही त्याला दिली. या चौघांच्या मारहाणीत सागर गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याला सोडलं आणि पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या सागरवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि नंतर पुढचा सर्व प्रकार उघडकीस आला.
मयुरीला सागर पसंत नव्हता. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. म्हणून तिने सागरला ठार मारण्यासाठी आदित्य दांगडे, शिवाजी जरे, इंद्रभान कोळपे आणि सुरज जाधव या चौघांना दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती. यवत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्यात सागर कदम हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाठीला गंभीर दुखापतही झाली आहे. पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली. तर या कटातील सूत्रधार मयुरी दांडगे मात्र अजूनही फरार आहे. या घटनेमागे अजूनही काही कारण आहे का याचा तपास पोलीस घेत आहे.