पत्नीला घरात प्रवेश नाकारला अन् पुढं घडलं असं काही की.., न्याय पतीला मिळाला
By नम्रता फडणीस | Published: May 13, 2023 03:45 PM2023-05-13T15:45:15+5:302023-05-13T15:45:40+5:30
पत्नीच्या त्रासामुळे पतीने घट्स्फोटासाठी अर्ज केला तर पत्नीनेही पतीविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत केस दाखल केली होती
पुणे : आठ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले. किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने ती मुलीला घेऊन माहेरी गेली. पत्नीच्या त्रासामुळे पतीने घट्स्फोटासाठी अर्ज केला तर पत्नीनेही पतीविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत केस दाखल केली. पत्नीची केस प्रलंबित असतानाही पत्नीने माहेरची जागा अपुरी पडत असल्याने पतीने राहत्या घरात राहण्यास जागा द्यावी असा अर्ज केला. मात्र नाते संपुष्टात आले असल्याने एकाच घरात राहिल्यास वादविवाद होतील असा युक्तिवाद पतीच्या वकिलांनी न्यायालयात केला. तो ग्राहय धरीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगांवकर यांनी पत्नीचा अर्ज नामंजूर केला.
राहुल आणि भाग्यश्री (नावे बदलेली) दोघांचे लग्न 2016 रोजी झाले. लग्नानंतर मुलगी झाल्यानंतर किरकोळ कारणांवरुन वाद होऊ लागल्यामुळे 2017 साली नव-याचे घर सोडून पत्नी मुलीला घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. पत्नीच्या त्रासाने 2017 साली पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला तर पत्नीनेही पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. मात्र माहेरची जागा अपुरी पडत असल्याने पतीच्या राहत्या घरात राहण्यास जागा द्यावी असा अर्ज पत्नीने 2022 मध्ये केला. अर्जास पतीने जबाब दिला. न्यायालयात घटस्फोट अर्ज दाखल असून, तो प्रलंबित असल्याने पती पत्नी एकत्र आल्यास घटस्फोट अर्जाचे मूळ कारण संपुष्टात येईल, तसेच पती पत्नी ह्यांच्यातील नाते संबंध 2017 पासून विभक्त राहात असल्याने संपुष्टात आले असल्याचे आहे. जर आता पती पत्नी ह्यांना एका घरात राहण्या बाबत आदेशित केल्यास त्यांच्यात वादविवाद होऊन नवीन तक्रारी व केसेस दाखल होतील आणि लहान मुलीचा विचार करता कि जी एका वर्षा पेक्षा कमी वयाची असतांना आई सोबत राहत आहे अश्या परिस्थिती मध्ये तिच्या मनात संभ्रम निर्माण होईल असा युक्तिवाद पतीच्या वतीने अँड. राठी यांनी केला. अँड. राठी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने पत्नीचा अर्ज नामंजूर केला. प्रकरणात पतीच्या वतीने अँड. अमित राठी आणि अँड अविनाश पवार यांनी काम पहिले. अँड पूनम मावाणी आणि अँड प्राची जोग यांनी सहकार्य केले.