पती आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप करणाऱ्या पत्नीला न्यायालयाचा दणका, घटस्फोट मंजूर
By नम्रता फडणीस | Updated: October 30, 2023 15:20 IST2023-10-30T15:17:46+5:302023-10-30T15:20:50+5:30
तिने 5 लाख रुपयांची केलेली नुकसान भरपाईची मागणीही न्यायालयाने फेटाळली.....

पती आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप करणाऱ्या पत्नीला न्यायालयाचा दणका, घटस्फोट मंजूर
पुणे : पतीचे अनेक स्त्रियांबरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. तो दारूच्या आहारी गेलेला आहे. अश्लील पुस्तके वाचून पत्नीशी त्याप्रमाणे वागत असे. पतीचा भाऊ गुंड प्रवृत्तीचा आहे. कुटुंबीय तिला मारहाण केल्याचे आरोप केले. मात्र, हे आरोप पत्नी सिद्ध करू शकली नाही. पती आणि कुटुंबियांवर तथ्यहीन गंभीर आरोप करणाऱ्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने दणका दिला आहे. त्यामुळे न्यायालयाने पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. तिने 5 लाख रुपयांची केलेली नुकसान भरपाईची मागणीही न्यायालयाने फेटाळली.
राकेश आणि लीना (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. तो नोकरी करतो. तर ती व्यावसायिक आहे. या दाव्यात पतीतर्फे ॲड. के.टी.आरू-पाटील, ॲड. केदार केवले, ॲड. संभाजी पांचाळ, ॲड. प्रज्ञा गुरसळ आणि ॲड. दिव्यश्री कुंभार यांनी काम पाहिले. दोघांचा विवाह जून 1997 मध्ये झाला. काही वर्षे दोघांनी सुरळीत संसार केला. दोघांना एक मुलगा आहे. दरम्यान तिचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले. ही बाब निदर्शनास येताच, पतीने तिला समज दिली. तिच्या स्वभावात फरक पडेल, अशी त्याला आशा होती. मात्र, तिच्या वर्तणुकीत फरक पडलाच नाही. कोणत्याही कारणाशिवाय ती मुलाला घेऊन 2004 मध्ये माहेरी गेली.
पतीने मध्यस्थामार्फत नांदण्यास येण्यास प्रयत्न केले. मात्र, तिने नांदण्यास नकार दिला. सन 2015 मध्ये पती आणि कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला. त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले होते. मात्र, त्या दाव्यापेक्षा घटस्फोटाच्या दाव्यात अचानक बदनामीकारक आणि घाणेरडे आरोप केले. ते आरोप सिध्द न करता आल्याने क्रुरतेनुसार न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला .