घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने केला खून; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 09:39 AM2024-06-07T09:39:58+5:302024-06-07T09:40:25+5:30

आरोपींच्या हल्ल्यात प्राजक्ता यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली आहे....

The wife's second husband was killed with a sharp knife after breaking into the house; Incidents in central Pune | घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने केला खून; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना

घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने केला खून; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना

पुणे : पत्नीने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरून पहिल्या पतीने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन पत्नीच्या दुसऱ्या पतीचा धारदार हत्याराने खून केला. सुमीत उर्फ सोनल पटेकर (रा. अग्रवाल प्राईड, पवळे चौक, कसबा पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी प्राजक्ता पटेकर (३४, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सनी राजेंद्र मारटकर (रा. खडकी, गवळी आळी) आणि त्याच्या साथीदारावर खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या हल्ल्यात प्राजक्ता यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली आहे.

आरोपी सनी हा फिर्यादी महिलेचा पहिला पती आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर प्राजक्ता यांनी सुमित याच्यासोबत विवाह केला. त्याचा राग आरोपी सनी याच्या डोक्यात होता. त्यातूनच सनी याने आपल्या एका साथीदाराला सोबत घेऊन दुपारी पावणेतीनच्या सुमारास महिलेच्या कसबा पेठेतील घरात घुसला. त्यावेळी फिर्यादी महिला, त्यांची सासू आणि पती गप्पा मारत बसले होते. काही कळण्याच्या आतच सनी आणि त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्राने सुमीत याच्यावर खुनी हल्ला केला. त्याच्या डोक्यात, तोंडावर आणि हातावर वार करण्यात आले.

हा प्रकार पाहून फिर्यादींनी पती सुमीत याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरदेखील सनी याने डोक्यात आणि हातावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झाल्याने सुमीत याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त रंगनाथ उंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा फरासखाना पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

Web Title: The wife's second husband was killed with a sharp knife after breaking into the house; Incidents in central Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.