Video: आत्महत्या करण्यासाठी महिलेची थेट पाण्यात उडी; जीवाची पर्वा न करता पोलिसाने वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 02:42 PM2022-04-04T14:42:52+5:302022-04-04T15:05:32+5:30
महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारल्यावर एका पोलिसाने जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले आहेत
पुणे : सिंहगड रस्त्यावरील तुकाई नगर येथे एक महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवत दोन पोलिसांनी धाडसी कामगिरी करून दाखवली आहे. महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारल्यावर एका पोलिसाने जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले आहेत. सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शैलेश नेहरकर आणि पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद अशी त्यांची नावे आहेत. तर प्रतीक्षा रोहित कांबळे (वय २७ वर्षे) असे त्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसर, आज सकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद आणि पोलीस नाईक शैलेश नेहरकर असे मिळून वडगाव मार्शल दिवस पाळी कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना १० वाजून ५८ मिनिटांनी कॉल आला की, तुकाई नगर येथील कॅनॉल मध्ये एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असून त्यांना ताबडतोब पोलिसांची मदत हवीये. कॉल रिसिव्ह करून काशीद आणि नेहरकर दोघे घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा प्रतीक्षा कांबळे या कॅनॉल समोर उभ्या राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. दोघांनी त्यांना खूप समजण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. कांबळे यांना बोलण्यात व्यस्त करून दोघांनी फायर ब्रिगेडची मदत मागवली. परंतु फायर ब्रिगेड येण्याअगोदरच प्रतीक्षा यांनी पाण्यात उडी मारली. त्यावेळी जीवाची पर्वा न करता वडगाव मार्शल चे अंमलदार पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद यांनी कॅनॉलमध्ये उडी मारून महिलेचे प्राण वाचवले. आणि महिलेला सुखरूप बाहेर काढले.
पुण्यात महिलेने आत्महत्या करण्यासाठी पाण्यात उडी मारली, पोलिसाने जीवाची पर्वा न करता वाचवले महिलेचे प्राण #pune#Policepic.twitter.com/uEGRUeSArB
— Lokmat (@lokmat) April 4, 2022