Crime News : मोफत पैशांचे वाटप सुरू असल्याची बतावणी करत महिलेला लुटले
By नितीश गोवंडे | Published: November 29, 2024 06:44 PM2024-11-29T18:44:34+5:302024-11-29T18:44:34+5:30
पुणे : रस्त्याने पायी चाललेला एकट्या महिलेला गाठून दोन चोरट्यांनी तिला पंजाबमधून मोठे साहेब आले असून, ते मोफत राशन ...
पुणे : रस्त्याने पायी चाललेला एकट्या महिलेला गाठून दोन चोरट्यांनी तिला पंजाबमधून मोठे साहेब आले असून, ते मोफत राशन आणि पैशांचे वाटप करणार आहेत. त्यासाठी गरीब दिसणे आवश्यक असून, तुमच्याकडील दागिने आमच्याकडे ठेवायला द्या, पैसे मिळाल्यानंतर पुन्हा माघारी देतो, अशी बतावणी करत महिलेकडील ४५ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास स्वारगेट परिसरात घडली. याप्रकरणी रेखा महाजन (५०, रा. आंबेगाव पठार) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रेखा महाजन १६ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास नातेवाइकांना भेटण्यासाठी नाकोडा ट्रॅव्हल्सच्या कार्यालयापासून पर्वती गावात पायी जात होत्या. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना पाठलाग करून गाठले. त्यांच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात करत, पंजाबहून मोठे साहेब आले असून, त्यांना मोफत राशन आणि पैशांचे वाटप करावयाचे आहे. त्यासाठी गरीब दिसणे गरजेचे आहे. तुमच्याकडील दागिने आमच्याकडे ठेवायला द्या. पैसे मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा तुम्हाला दागिने देतो, असे म्हणत चोरट्यांनी महिलेकडील ४५ हजारांचे दागिने ताब्यात घेतले. त्यानंतर आम्ही साहेबांना घेऊन येतो, असे सांगून चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी नानासाहेब भांदुर्गे करत आहेत.