Shriram Lagoo: पुण्यात ’नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने नाट्यगृह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 11:03 AM2022-11-17T11:03:15+5:302022-11-17T11:03:23+5:30
नटसम्राटांच्या जन्मदिनी चिरंजीव डॉ. आनंद लागू यांची घोषणा
पुणे : प्रायोगिक रंगभूमीसाठी पुण्यात विविध छोटेखानी नाट्यगृह असली तरी सर्व प्रकारच्या नेपथ्य रचनांसाठी पूरक आणि नृत्य, नाट्य, संगीत, सिनेमा, दृकश्राव्य कला अशा सर्व कलांना अवकाश देणारे अद्ययावत आणि परिपूर्ण व्यासपीठ तयार व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे एका नवीन नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. अभिनयातील ’नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने हे नाट्यगृह उभारण्यात येणार असून, त्यासाठी लागू कुटुंबीयांच्या वतीने ६० लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. लागू यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. आनंद लागू यांनी बुधवारी केली. यावेळी लागू यांची कन्या डॉ. शुभांगी कानिटकर व महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, "पुण्यात समीप नाट्याचा अनुभव देणारी काही नाट्यगृहे उपलब्ध आहेत. तसेच प्रायोगिक नाटकांसाठी इतरही काही नाट्यगृहे आहेत. मात्र एकाच ठिकाणी विविध प्रयोग करून पाहण्याची शक्यता उपलब्ध करून देणारे नाट्यगृह नव्हते. या विचारातून महाराष्ट्र कल्चरल सेंटरने या नाट्यगृहाची कल्पना मांडली. सेंटरच्या विद्यमान इमारतीतच पहिल्या मजल्यावर हे नाट्यगृह तयार होणार आहे. २५०-३०० आसन क्षमतेचे हे नाट्यगृह पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे."
डॉ. आनंद लागू म्हणाले, "महाराष्ट्र कल्चरल सेंटरने या नाट्यगृहाला डॉ. श्रीराम लागू यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला आम्ही आनंदाने होकार दिला. तसेच, कोरोना काळात क्षणभंगुरतेची जाणीव झाल्याने काहीतरी चिरस्थायी उभे राहावे, हा विचार मनात घोळत होताच. त्यातूनच या नाट्यगृहाला आर्थिक साहाय्य करायचे आम्ही ठरवले."
तन्वीर सन्मान स्थगित
यंदापासून डॉ. लागू यांच्या जन्मदिनी म्हणजेच १६ नोव्हेंबरला तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने दिला जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्षे प्रत्यक्ष स्वरूपात तन्वीर सन्मान व तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान करता आले नाहीत. यावेळी केवळ तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तन्वीर सन्मान यंदा स्थगित करण्यात आला असल्याचेही डॉ. आनंद लागू यांनी सांगितले.