थिएटर देता का थिएटर?
By Admin | Published: April 20, 2015 04:28 AM2015-04-20T04:28:46+5:302015-04-20T04:28:46+5:30
‘कुणी या तुफानाला, घर देता का घर?’ हा नटसम्राटमधील संवाद. अप्पासाहेब बेलवलकर या नटसम्राटाची व्यथा. परिस्थितीने गांजलेल्या नटसम्राटाची आर्जव
विश्वास मोरे, पिंपरी
‘कुणी या तुफानाला, घर देता का घर?’ हा नटसम्राटमधील संवाद. अप्पासाहेब बेलवलकर या नटसम्राटाची व्यथा. परिस्थितीने गांजलेल्या नटसम्राटाची आर्जव. अतिरंजित मनोरंजनाच्या नावाखाली चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांच्या मालिका अशी कलेवर येणारी वादळे आक्रमणे पचवून रंगभूमी ‘तरून’ आहे. सांस्कृतिकनगरीचा टेंभा मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये नाटक आणि संगीत क्षेत्रातील संस्थांना ‘थिएटर देता का, कोणी आमच्या नाटकांना थिएटर देता का?’ असे म्हणण्याची वेळ आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नाट्यगृहात नाटकांना ‘प्राइम टाइम’ मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
ही व्यथा आहे शहरातील एका मान्यवर नाट्यसंस्थेची. प्रायोगिक रंगभूमी जिवंत ठेवण्याचे काम करीत आहे. या संस्थेने भारताच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक शोभायात्रा काढण्यात येते आणि त्या निमित्ताने भूमिका आणि पडद्यामागील भावभावनांचा वेध घेतला आहे. प्रायोगिक रंगभूमीला वाहून घेतलेल्या एका संस्थेच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी नाटकासाठी शनिवार, रविवार आणि गुरुवारपैकी प्राइम टाइम मिळावा, या दृष्टीने चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह मिळावे, म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार लॉट पद्धतीने त्यांना रविवार, दिनांक २६ एप्रिल सायंकाळी पाच वाजता ही तारीखही देण्यात आली. दरम्यान, याच कालखंडात एक राज्यस्तरीय परिषद संबंधित दिवशी येत होती. त्यांच्याशीही मिळतेजुळते घेऊन परिषद आणि कला सादरीकरण असे नियोजन झाले. त्यानुसार कलावंत कामाला लागले. नियोजन झाले. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर मात्र, नाट्यगृह व्यवस्थापनाने संस्थेला अचानक पत्र एक पाठविले. ‘आपणास दिलेली तारीख आम्ही ती काढून घेण्यात येत आहे. आपणाबरोबर केलेला करार रद्द समजावा.’ असे पत्र मिळताच कलाकार आणि तंत्रज्ञ अवाक झाले. आता करायचे काय? दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उभा राहिला. त्यांनी या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही तक्रार, दाद मागितली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. प्राइम टाइम मिळाल्याने मोठ्या जोमाने कामाला लागणाऱ्या कलावंतांच्या मेहनतीवर विरजण पडले. उघडपणे अन्याय होत असताना आपण काहीही करू शकत नाही, अशी भावना कलावंतांची झाली आहे. आयुक्तांच्या अधिकारांची भीती दाखवून किंवा राजकीय दबाव टाकून तारखा बदलण्याचे प्रकार नाट्यगृह व्यवस्थापनातील काही लोक करतात. अशा मुजोर कर्मचाऱ्यांची टोळी कार्यरत आहेत. राजकीय वरदहस्तामुळे त्यांच्यावर कोणाचाही वचक नाही. प्राइम टाइमबाबत मिळवून देणे आणि तो काढून घेण्यासाठी मोठी चढाओढ सुरू असते.
महापालिकेचा गल्लाभरू उद्देश
शहरात चिंचवडला प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, संत तुकारामनगरात आचार्य अत्रे रंगमंदिर अशी नाट्यगृह आहेत. सांस्कृतिक चळवळींना बळ मिळावे, नाट्य-नृत्य-संगीत-साहित्य या कलांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नाट्यगृहांची निर्मिती करण्यात आली. महापालिकेचे गल्लाभरू धोरण यामुळे ठिकाणी कलाविषयक उपक्रमांना प्राधान्य देण्याऐवजी इतर उपक्रमांवर भर दिला जात आहे.