संगीत नाटकांसाठी नाट्यगृहे उपलब्ध व्हावीत : चारुदत्त आफळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 12:18 PM2019-06-29T12:18:17+5:302019-06-29T12:24:08+5:30
महाराष्ट्राला संगीत नाटकांची समृध्द परंपरा लाभली आहे. मात्र..
पुणे : महाराष्ट्राला संगीत नाटकांची समृध्द परंपरा लाभली आहे. मात्र, या परंपरेचा म्हणावा तितका प्रचार आणि प्रसार झालेला नाही. कलाकारांप्रमाणेच महानगरपालिकेने यासाठी पुढाकार घ्यायला हवा.सध्याची संगीत नाटकांची परिस्थिती विचित्र आहे. महापालिकेने महिन्याच्या एका शनिवार आणि रविवारी नाट्यगृहे उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून कलाकारांना कायमस्वरुपी काम उपलब्ध होईल, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते आणि कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. माज्या यशामध्ये शिलेदार नाटक कंपनी, भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्यासह अनेक संस्था आणि व्यक्तींचा मोठा वाटा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पुणे महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी चारुदत्त आफळे यांना शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक गायत्री खडके, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले आदी या वेळी उपस्थित होते. कला क्षेत्रातील कामगिरीबद्दल ऋत्विक व्यास, गौरव बर्वे, अरुण जगताप, अली हुसेन, कविता टिकेकर, कुमार गोखले यांनाही विशेष पुरस्कार देऊन गौैरवण्यात आले.
आफळे म्हणाले, आम्ही जेव्हा एखाद्या नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी परदेशी जातो, तेव्हा तेथील गाजलेल्या नाटककारांचे प्रयोग पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते. अनेक प्रयत्नांनंतर आम्ही तिकीटे मिळवून ते प्रयोग पाहतो. परंतु, एखादा परदेशी रसिक पुण्यात, महाराष्ट्रात येतो, तेव्हा त्याला संगीत नाटकाच्या परंपरेबद्दल असे वाटत नाही. अर्थिक कारणांमुळे नाटकात काम करण्यासाठी कलाकार मिळत नाहीत. अनेकदा प्रयोगांची शाश्वती नसल्याने उदयोन्मुख कलावंत संगीत नाटकांकडे पाठ फिरवत आहेत.
शौनक अभिषेकी म्हणाले, मास्टर दीनानाथ, बालगंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, वंसतराव देशपांडे या मंडळींनी अभिजात संगीताची परंपरा अजरामर केली आहे. यांच्यामुळेच आम्ही आज संगीताची साधना करू शकतो. आमची पिढी या व्यक्तींच्या कायम ऋणात राहील, यात मला शंका वाटत नाही. चारुदत्त आफळे यांच्या रुपाने कीर्तन आणि अभिजात संगीत अशा दोन्ही परंपरा जपल्या जात आहेत, याबद्दल विलक्षण समाधान वाटते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चारुदत्त आफळे यांनी बालगंधर्व यांच्यावर आधारीत कीर्तन सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
-----------------
खंडित वीजपुरवठ्यामुळे किर्तनात खंड
शुक्रवारी शहरात मुसळधार पावसाने दिवसभर हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. बालगंधर्व पुरस्कार सोहळयालाही या खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला. पुरस्कार सोहळयानंतर ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, व्यासपीठावरील वीज गेल्याने तब्बल सहा वेळा किर्तन थांबवावे लागले. त्यामुळे कलाकारांना व्यत्यय आलाच; मात्र, महापालिकेच्या या कारभारावर उपस्थितांनीही ताशेरे ओढले.