ज्येष्ठ रंगकर्मी मधुजी गायकवाड यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 07:51 PM2020-08-25T19:51:08+5:302020-08-25T19:55:53+5:30
नाट्य क्षेत्राबरोबरच संगीत क्षेत्रातही मधुजी यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला..
पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी आणि शहनाईवादक मधुकर केशवराव उर्फ मधुजी गायकवाड (वय ९२ वर्षे ) यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.
सनईसम्राट स्व. शंकररावजी गायकवाड यांचे नातू व शहनाई सुंद्री वादक विद्वान डॉ. पं. प्रमोद गायकवाड यांचे ते चुलत थोरले बंधू होते. त्यांच्या मागे मुलगा मंदार, सून निता व नात अदविका असा परिवार आहे. नाट्य क्षेत्राबरोबरच संगीत क्षेत्रातही त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या ढंगाने ते शहनाई वादन करत असतं.
युगे युगे मी वाट पाहिली, कुंकवाचा करंडा, आई आहे शेतात, थांब लक्ष्मी कुंकू लावते इ. मराठी सिनेमा स्वयंसिध्दा, लंडनची सून इंडियात हनीमून, गाव बिलंदर बाई कलंदर, सौजन्याची ऐशी तैशी, पती गेले ग काठीवाडी, लावणी भूलली अभंगाला इ. अनेक मराठी नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्याकाळच्या सुप्रसिद्ध मराठी नायिका जयश्री गडकर यांच्या बरोबर देखील नायक म्हणून त्यांनी काम केले. तसेच मधू कांबीकर, जयमाला इनामदार यांच्याबरोबर अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामे केली. रंगभूमीवर प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
....