सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातील १८ लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 09:06 PM2018-06-22T21:06:40+5:302018-06-22T21:24:35+5:30
टेलिफोन बँकींगद्वारे अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून तब्बल १८ लाख १६ हजार ८२० रुपये रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या बँक खाते व डेबीट कार्डची माहिती घेऊन टेलिफोन बँकींगद्वारे अज्ञात व्यक्तीने खात्यातून तब्बल १८ लाख १६ हजार ८२० रुपये रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नंदा चौधरी (वय ५२, मगरपट्टा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा चौधरी यांचे पती मुंबई येथून पोलीस दलातून एक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना सेवानिवृत्तीनंतर काही रक्कम मिळाली होती. २९ जून २०१७ ते ९ जून २०१८ या कालावधीत त्यांच्या खात्याचा क्रमांक व डेबीट कार्ड यांची गोपनीय माहिती घेऊन टेलिफोन बँकींगद्वारे अज्ञात व्यक्तीने खात्यातील १८ लाख १६ हजार ८२० रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यावर नंदा चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) ए. के. बागवान करीत आहेत.