वडगावशेरीतून महागड्या "ऑडी" कारची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 08:31 PM2018-09-17T20:31:41+5:302018-09-17T20:32:27+5:30
वडगावशेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटीतून एका व्यावसायिकाची तीस लाख रुपये किंमतीची महागडी ऑडी कार चोरीला गेल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला.
पुणे ः वडगावशेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटीतून एका व्यावसायिकाची तीस लाख रुपये किंमतीची महागडी ऑडी कारचोरीला गेल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला . मोनीश योगेश्वर कराचीवाला (वय ४२,डी- ६/४०१,ब्रह्मा सनसिटी सोसायटी वडगावशेरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध ऑडी कार चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
येरवडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनीश कराचीवाला हे वडगाव शेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटी येथे राहावयास असून त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे .१० सप्टेंबर २०१८ रोजी रात्री त्यांनी त्यांची ऑडी ब्लँक कार (एमएच १२,जेएम १२१२) हि सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी बाहेर गावी गेले होते . १२ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ऑडी कार पार्किंगमध्ये नसल्याचे त्यांच्या लक्षात आले . गाडीची शोधाशोध केली असता गाडी मिळून न आल्यामुळे रविवारी त्यांनी ऑडी कार चोरीला गेल्याची तक्रार येरवडा पोलिसात दाखल केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील बोबडे, तपासपथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी भेटी दिल्या.
कराचीवाला यांनी ही महागडी ऑडी कार नऊ महिन्यांपूर्वी बत्तीस लाख रुपये किंमतीला खरेदी केलेली आहे .तिची मूळ किंमत पासष्ठ लाख पंचवीस हजार इतकी असून ही महागडी कार चोरी झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .येरवडा पोलिसांनी सोसायटी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ही महागडी कार नेमकी कोणत्या उद्देशाने चोरी केली याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी करीत आहेत.