मध्यरात्री कापड दुकानातून रोख रकमेसह कपड्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:55+5:302021-08-19T04:15:55+5:30
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर मशिनची वायर कापून घरफोडी चोरी करण्यात आली. पूर्वमाहितीच्या आधारे परिसरातीलच तरुणांनीच चोरी केली असल्याचा संशय ...
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर मशिनची वायर कापून घरफोडी चोरी करण्यात आली. पूर्वमाहितीच्या आधारे परिसरातीलच तरुणांनीच चोरी केली असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. चोरीच्या घटनेनंतर माळेगाव पोलिसांना याबाबत खबर देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. बुधवारी (दि. १८) ही घटना घडली. बारामती-फलटणलगत असणारे शिरवली अठरा फाटा येथील उत्तम हरिभाऊ पोंदकुले यांच्या मालकीचे वैभव क्लॉथ सेंटरमधून रात्री दोन वाजण्याच्या सुमाराला तीन अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील बाजूची खिडकी उचकटून आत प्रवेश केला. दरम्यान, साड्या, कपडे, तसेच काउंटर फोडून त्यातील रोख चलनी नोटा व चिल्लरचे पोते असा अंदाजे २ लाख रुपयांच्या जवळपास मुद्देमालाची चोरी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली. चोरीदरम्यान कापड दुकानाचे मालक व त्यांच्या पत्नी हे दुकानात झोपलेले होते. मात्र, चोरट्य़ांची कुजबुज लागल्याने ते जागे झाले. यामुळे चोरांनी तेथून पळ काढत चारचाकी वाहनाद्वारे सर्व मुद्देमाल चोरून नेला होता. तर या वेळी तीन चोरट्यांपैकी एकाचा चेहरा पाहिला आणि तो यापूर्वी दुकानातील कर्मचारी असल्याचे दुकानमालकांकडून सांगण्यात आले. याबाबत माळेगाव पोलीस स्टेशनला माहिती कळवताच पोलीस हवालदार रावसाहेब गायकवाड यांनी होमगार्ड यांना सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी धूम ठोकत पळ काढला. याबाबत ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.