पुण्यात कोव्हीड लसीकरण केंद्रातच चोरी; कॉम्प्युटर केला गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 14:16 IST2021-08-26T14:14:56+5:302021-08-26T14:16:59+5:30
लसीकरण केंद्र बंद असल्याचा फायदा घेत केला हा प्रकार

पुण्यात कोव्हीड लसीकरण केंद्रातच चोरी; कॉम्प्युटर केला गायब
पुणे : कोराेना विरोधी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद असल्याचा फायदा उठवून चोरट्याने लसीकरण केंद्रात शिरुन चोरी केल्याचे उघड झाले आहे.कर्वेनगरमधील शाहु कॉलनीमधील नियोजन शाळा येथे २३ व २४ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी समर्थ पवार (वय २०, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पवार हे महापालिकेच्या आरोग्य विभागात मनपा शाळेतील कोविड लसीकरण केंद्रात नोकरी करतात. सध्या कोविडची लस उपलब्ध नसल्याने हे लसीकरण केंद्र बंद आहे. लसीकरण केंद्रासाठी महापालिकेने एक संगणक दिला असून तो शाळेतील जिनाच्या बाजूला असलेल्या खोलीत ठेवला होता. चोरट्याने या खोलीचे कडीकोयंडा उचकटून कडी कोयंड्याचा बॉक्स व संगणक असा ६० हजार रुपयांचा माल चोरुन नेला.