टँकरमधून गॅसची चोरी; काळ्या बाजारात विक्री करणारे तिघे अटकेत, तब्बल १ कोटींचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:36 PM2021-12-14T15:36:58+5:302021-12-14T15:37:06+5:30
गॅस काळ्याबाजारात विकण्यासाठी ठेवला असताना पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत तब्बल एक कोटी दहा लाखांचा गॅस साठा जप्त केला आहे
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील रासे येथे गॅसच्या टँकरमधून गॅस चोरी करून तो काळ्याबाजारात विकण्यासाठी ठेवला असताना पिंपरी - चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत तब्बल एक कोटी दहा लाखांचा गॅस साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नरसिंग दत्तू फड (वय ३१, रा. धसवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), अमोल गोविंद मुंडे (वय २८, रा. वागदरवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), राजु बबन चव्हाण (वय ५२, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची कारवाई रविवारी मध्यरात्री करण्यात आली. नरसिंग आणि अमोल यांना इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथून रासे येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचा गॅस टॅंकर आणण्याबाबत परिवाहक म्हणून नेमले आहे. त्या दोघांनी मुंबई येथून रासे येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचे दोन टँकर चाकण येथे घेऊन जाणे अपेक्षित असताना ते टाळले. तसेच जाणीवपूर्वक वाहतुकीदरम्यान दोन गॅस टँकर मधून गॅस काढून घेण्यासाठी आरोपी राजू याला संमती दिली.
दरम्यान राजू याने त्याच्याकडील गॅस कनेक्टरच्या सहाय्याने गॅस टॅंकर मधील गॅस चोरून घेतला. चोरीचा गॅस काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने, मानवी जीवन धोक्यात येईल अशा प्रकारच्या हयगयीने तो साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास कारवाई करत तब्बल १ कोटी १० लाख पाच हजार १४५ रुपये किमतीचा गॅस जप्त केला.