बारामती: शिरसाई देवीच्या मंदिराचे दरवाजे तोडून सोन्या-चांद्याची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:10 PM2022-01-08T12:10:29+5:302022-01-08T12:21:30+5:30
दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे
उंडवडी कडेपठार: बारामती तालुक्यातील प्रसिध्द शिरसाई देवी मंदिराचे दरवाजे तोडून मध्यरात्री देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली. मंदिराच्या गेटला असलेले कुलुप तोडून चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या सोन्या-चांदिच्या दागिन्यांसह २० किलोचा पितळी सिंह, पितळी समया, स्पिकर मशीन, पंचारती धुपआरती व इतर सामान असा जवळपास तीन लाखांपर्यंत ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले चोरीचा तपास सुरू आहे.
शिरसाई मंदिरात काकड आरती चालू असल्याने पहाटे साडेचार वाजता मंदिरातील पुजारी व गावकरी मंदिरात गेले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. बारामती येथील पोलिसांनी पंचनामा करुन मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु केले आहे. यात एक महिला व दोन पुरुष असल्याचे माहिती मंदिरातील पुजारी संजय गुरव, सरपंच आप्पासाहेब आटोळे व ग्रामस्थांनी दिली.
बारामती तालुक्यातील शिरसुफळ शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. असे असताना शुक्रवार मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे तोडून मंदिरात प्रवेश केला आणि देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. सकाळी पुजाऱ्यांनी ग्रामस्थांच्या चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे. शिरसाई देवीच्या मंदिरातील दागिण्यांची चोरी झाल्याने ग्रामस्थ, सर्व लहान मोठे व्यवसायिक आणि व्यापारी यांनी निषेधार्थ गावत बंद पाळला आहे.