चोरट्यांनी लांबवले ५ तोळे सोने; पुणे जिल्ह्यातील कोरेगाव मूळमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:03 PM2018-02-24T13:03:17+5:302018-02-24T13:03:17+5:30
घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली.
लोणी काळभोर : घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली.
याप्रकरणी योगेश राजेंद्र क्षीरसागर (वय २५, रा. ड्रीम्स निवारा, पी २ बिल्डिंग, फ्लॅट क्रमांक १३६, कोरेगाव मूळ, ता. हवेली, मूळ रा. धानोरे, ता. म्हाडा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश क्षीरसागर हे शेवाळवाडी येथील हुंदका शोरूम मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करतात. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते कामासाठी निघाले. त्यांची पत्नी स्वाती यांचे पुणे येथे काम असल्याने त्याही त्यांच्यासमवेत निघाल्या. जाताना त्यांनी फ्लॅटच्या दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावले.
पुणे येथील काम झाल्यानंतर स्वाती क्षीरसागर या दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी पोहचल्या, त्यावेळी त्यांना फ्लॅटच्या सेफ्टी दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी हा प्रकार पतीला कळवला. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता त्यांना घरातील लोखंडी कपाटाचे कुलुप तुटलेले व कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६५ हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे वजनाचे गंठण, १५ हजार ६०० रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे एक जोड कानातील झुबे, ४ हजार ८०० रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे कानातील स्टोनर, १५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे दोन जोड, कानातील टॉप्स, २७ हजार १०० रुपये किमतीचे एक तोळे वजनाच्या दोन पिळ्याच्या अंगठ्या, ८ हजार ९०० रुपये किमतीचे तिन ग्रॅम वजनाचे कानातील वेल, ९०० रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे कानातील रिंग, ९०० रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाचे नथ असा एकूण १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एल. ननावरे हे करत आहेत.