डोंगर फोडून मुरमाची होतेय चोरी
By admin | Published: March 25, 2017 03:24 AM2017-03-25T03:24:20+5:302017-03-25T03:24:20+5:30
परिसरातील गव्हाणेवस्ती-ठाकरवाडी या परिसरात डोंगर फोडून मुरुमाची चोरी होत आहे. महसूल विभागातील कर्मचारी व मुरूमचोर यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.
दावडी : परिसरातील गव्हाणेवस्ती-ठाकरवाडी या परिसरात डोंगर फोडून मुरुमाची चोरी होत आहे. महसूल विभागातील कर्मचारी व मुरूमचोर यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागात सेझ प्रकल्प आला. दावडी, निमगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी, डोंगर, माळरान सेझने संपादित केले आहेत. सुरुवातीला सेझने जमीन संपादित करण्यात आली होती. नंतर भूसंपादन केलेल्या जागेवर विमानतळाचा प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या होत असलेल्या विरोधामुळे विमानतळ पुरंदर तालुक्यात हलविण्यात आला. सेझसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या सातबाराच्या उताऱ्यावर अजूनही शिक्के तसेच आहेत. अजूनही काही जागांवरती प्रकल्प उभे न राहिल्याने जमिनी, माळराने, डोंगर मोकळे पडले आहेत. याचाच फायदा घेऊन येथील धनदांडगे राजरोसपणे मुरुमचोरी करीत आहेत. कित्येक वेळा ग्रामस्थांनी तक्रार देऊनही महसूल विभागातील कर्मचारी याकडे काणाडोळा करीत आहेत. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. सुरुवातीच्या सेझ प्रकल्पासाठी शासनाने जमिनीवर शिक्के टाकले होते. त्या वेळी जमिनीतील माती वीट्टभटीवाल्यांना विकण्याचा सपाटा लावला होता. आता ही मुरूमचोरी रोखणार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. (वार्ताहर)