इंदापूरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सव्वादोन लाखांच्या सोनसाखळ्यांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:09 PM2022-07-05T12:09:45+5:302022-07-05T12:09:52+5:30
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गर्दीच्या ठीकाणी सोनसाखळी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या
इंदापूर : इंदापूर येथे जगतगूरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गर्दीच्या ठीकाणी सोनसाखळी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या मैदानातील रिंगण सोहळ्यात दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरीस गेली. तर इंदापूर बारामती बायपास चौक येथे संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेताना सव्वा दोन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना एकाच दिवशी व एकाच वेळेस घडल्या असून याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश सुर्यभान धोरकट (वय ५९, रा.अक्षय अनंत अपार्टमेंट, दत्तनगर इंदापूर) व बबन ज्ञानदेव जगताप (वय ६५ रा.सरस्वतीनगर इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पहिल्या घटनेत शनिवार दि.२ जुलै रोजी धोरकट हे कुटुंबीयासह संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी अकलुज येथील बारामती बायपास चौक येथे सकाळी गेले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा दोन तोळे वजनाची व सव्वा लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली. असे धोरकट यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
दुसऱ्या घटनेत शनिवार दि.२ जुलै रोजी सकाळी सुमारास इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील रिंगण सोहळ्यात चोरीचा प्रकार घडला. गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची व एक लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. असे जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. वरील दोन्ही घटना या एकाच दिवशी व एकाच वेळेला घडल्या आहेत. यामध्ये एकुण सव्वादोन लाख रूपये किंमतीचे व साडेचार तोळे वजनाचे सोने चोरीस गेले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.