नशेची चटक भागवण्यासाठी मोबाईल चोरी, तब्बल ३२ संच जप्त; नऊ गुन्हे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 02:35 PM2023-09-12T14:35:25+5:302023-09-12T14:35:37+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याला अटक केली...
पुणे : अमली पदार्थांची नशा करण्यासाठी लागणारे पैसे मिळविण्यासाठी तो मोबाईल चोरी करू लागला. पहाटेच्या वेळी उघड्या खिडकी, दरवाजातून तो ही चोरी करत असे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ६८ हजार ३०० रुपयांचे ३२ मोबाईल, दुचाकी जप्त केली आहे. रेय्यान ऊर्फ फईम फय्याज शेख (वय २०, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) असे आरोपीचे नाव आहे.
सोमवार पेठेतील एका घराच्या उघड्या दरवाजातून आत शिरून चोरट्याने ३३ हजार रुपयांचे ४ मोबाईल चोरून नेले. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत होती. पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे यांना भवानी पेठेतील त्रिवेणी गार्डन येथे चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर सापळा रचून रेय्यान शेख याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे ३२ मोबाईल आढळून आले. त्याने हे मोबाईल शहरातील विविध भागातून उघड्या दरवाजा आणि खिडकीमधून घरात प्रवेश करत तसेच पायी चालणाऱ्यांच्या हातून चोरले आहेत. तसेच चोरी करण्यासाठी त्याने दुचाकीही चोरल्याचे सांगितले.
रेय्यान याने खडक, फरासखाना, कोंढवा, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुलै २०२३ ते ३ सप्टेंबर या कालावधीत चोऱ्या केल्या. रेय्यान शेखकडून आतापर्यंत ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सैय्यद, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे, अण्णा माने, अभिनव लडकत, शुभम देसाई, अमोल पवार, अजय थोरात, शशिकांत दरेकर यांनी केली.