त्यांना न वाटली ‘पु. लं.’च्या साहित्यसंपदेची ‘अपुर्वाई’!; भामट्यांची ‘नस्ती उठाठेव’ : शब्दवैभव सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 05:10 PM2017-12-19T17:10:13+5:302017-12-19T17:18:23+5:30
‘संगती संग’ ही उक्ती केवळ महान व्यक्तींच्याच बाबतीत नव्हे; तर त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तूंच्या बाबतीतही लागू होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांना मंगळवारी हाच अनुभव आला.
पुणे : ‘संगती संग’ ही उक्ती केवळ महान व्यक्तींच्याच बाबतीत नव्हे; तर त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तूंच्या बाबतीतही लागू होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांना मंगळवारी हाच अनुभव आला. सोने, पैसे, दागिने अशी ऐहिक संपत्ती लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पु. लं.च्या घरी ‘धन शब्दांचीच रत्ने’ गवसली. अंतू बर्वा, सखाराम गटणे, चितळे मास्तर, व्यक्ती आणि वल्लींच्या आदींच्या सहवासाने समृध्द झालेले ‘गारुड’ पाहून आपण ‘नस्ती उठाठेव’ केल्याचा पश्चाताप झाल्याने चोरांनी तेथून पोबारा केला. चार वर्षांपूर्वीही अशीच घटना घडली होती.
एक अख्खीच्या अख्खी पिढी ‘पु. ल.’ ह्या नावावर जगली, वाढली आणि विस्तारली. मराठी माणसाच्या हळव्या मनाचा कोपरा पुलंनी बरोबर पकडला आणि साहित्यसंपदेतून त्यांनी मोठा ‘गणगोत’ जमवला. ‘चांदी सोपे रुपे आम्हा मृत्तिकेसमान’ अशी भावना असणाऱ्या पुलंना कायम साहित्यसंपदेबाबत ‘अपुर्वाई’ वाटत राहिली. आज पु. ल. असते तर ‘चोरीमध्ये वाईट काही नसतं, तुम्ही काय चोरता यावर ते अवलंबून असतं’ असेच म्हणाले असते. काहीच न गवसल्याने निराश झालेल्या चोरांची ‘वाऱ्यावरची वरात’ निघाली.
भांडारकर रस्त्यावरील मालती माधव सोसायटीत सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर पुलंच्या दोन सदनिका आहेत. ही घरे पु. ल. देशपांडे यांचे नातू दिनेश ठाकूर यांच्या ताब्यात असून ते अमेरिकेत वास्तव्यास असून तेथील विद्यापीठात प्राध्यापक आहेत. एका चर्चासत्रासाठी पुण्यात आले असतानाच त्यांना चोरीची घटना समजली. याच सोसायटीत राहत असलेल्या महेश अरस आणि उमेश ठाकूर यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
ठाकूर म्हणाले, ‘पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे यांच्यासह ब-याच साहित्यिकांनी फोनवरुन चोरीच्या घटनेची चौकशी केली. चोरांनी घरातील सामान अस्ताव्यस्त केले. त्यांनी कपाटातील सामानाचीही उलथापालथ केली. या कपाटात पु. लं.च्या संग्रही असलेली एक हजारहून अधिक पुस्तके आणि पत्रे आहेत. ती अस्ताव्यस्त करुन चोरांनी पैसे, दागिने शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने पुस्तकांचे काहीही नुकसान झालेले नाही.’
पुलंची पत्रे संकलित करुन पुढील वर्षी जन्मशताब्दीच्या निमित्ताने ती पुस्तकरुपात आणण्याचे काम सुरु आहे. पुण्यातील घरात असलेली लेखनसंपदाही आता आपल्याबरोबर घेऊन जाणार असल्याने दिनेश ठाकूर यांनी सांगितले.’ सोसायटीच्या ‘ए’ इमारतीमध्ये असलेल्या ओक अॅकेडमीजवळ सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र, चार-पाच चोरट्यांनी तोंडावर मास्क घालून सीसीटीव्ही फिरवून ठेवल्याने केवळ १० सेकंदांचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यावरुन पोलीस कसून चौकशी करत आहेत. पु. लं.ची सदनिका असलेल्या इमारतीजवळ सीसीटीव्ही नाही. इमारतीच्या देखरेखीसाठी वॉचमन नेमलेला आहे; मात्र, चोरांनी मागून प्रवेश केल्याने काही उपयोग झाला नाही. दोनदा चोरीची घटना घडल्याने आता येथील सुरक्षा वाढवणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे ते म्हणाले.
भांडारकर रोडवर मालती माधव या इमारतीत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे रहायला होते़ सध्या तेथे कोणीही रहात नाही़ पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली़ चोरट्यांनी बंद घर पाहून चोरट्यांनी ते फोडून आत चोरी करण्याचा प्रयत्न केला़ याबाबत महेश आरस यांनी डेक्कन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, चोरांनी घरातील कपाटांमध्ये उचकपाचक केली़ परंतु, तेथे त्यांना काहीही मिळाले नाही़ आसपासच्या तीन ते चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला आहे़ परंतु, त्यात काय चोरीला गेले याची माहिती मिळाली नाही़ या घटनेची माहिती मिळताच डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाली असून उपनगरांमध्ये दररोज किमान ३ ते ४ घरफोडीचा घटना होताना दिसत आहे़ या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी त्या रोखण्यात अजून तरी पोलिसांना यश आलेले दिसून येत नाही़ रात्रीच्या गस्तीला असणाऱ्या पोलिसांच्या संख्येत तिपटीने वाढ करणार असल्याचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.