‘माळेगाव’ च्या साखर कारखान्याच्या कार्यालयातुन 'प्रमोशन ऑर्डर फाईल' ची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 09:23 PM2020-08-27T21:23:38+5:302020-08-27T21:24:30+5:30
माळेगाव साखर कारखाना या घटनेमुळे चांगलाच चर्चेत
बारामती : राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय असणारा माळेगाव साखर कारखाना आज एका घटनेमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कारखान्याच्या कार्यालयातुन चक्क 'प्रमोशन ऑर्डर फाईल' ची चोरी झाली आहे.यानंतर कार्यकारी संचालकांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी कार्यकारी संचालक विजय मुकुटराव वाबळे (वय ६५ वर्ष) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान हा प्रकार घडला आहे.
अज्ञात आरोपी १ ते ३१ कामगारांपैकी कोणीतरी एक असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासकीय इमारती मधीलकपाटातून 'प्रमोशन ऑर्डर फाईल' चोरून नेल्या आहेत. मुद्दाम लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेल्याचे देखील फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान,माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीत सत्तापालट झाल्यानंतर ७ एप्रिल रोजी बाळासाहेब तावरे ,तानाजी कोकरे यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचाकार्यभार स्वीकारला.या पार्श्वभुमीवर गुरुवारी(दि २७) ग्रामीण पोलीसठाण्यात झालेल्या तक्रारीवरुन नव्या जुन्या संचालकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगण्याची चिन्हे आहेत.