इंदापूरला पुन्हा फोडली दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:32 PM2018-05-14T15:32:29+5:302018-05-14T15:32:29+5:30
दुकानांचे शटर उचकटून अनुक्रमे ४ हजार ८०० रुपये व १ हजार ४० रुपये अशी एकूण २७ हजार ४८० रुपयांची रोकड चोरी करण्यात आली आहे.
इंदापूर : इंदापूर-अकलूज रस्त्यालगत शिवाजीनगर भागात मेडिकल स्टोअर्स,पशुखाद्य व शेती साहित्य विक्रीची दुकानांचे शटर उचकटून त्यामधील २७ हजार ४८० रुपयांची रोकड लांबवल्याच्या आरोपावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द आज (दि.१४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात मधुकर ज्ञानेश्वर पाटील (रा.अंबिकानगर,इंदापूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पाटील हे इंदापूर अकलूज रस्त्यालगत शिवाजीनगर भागात राजर्षी शाहू महाराज मेडिकल व जनरल स्टोअर्स चालवतात. त्यांच्या जवळ बाबासाहेब सूर्यभान खांडेकर यांचे पशु खाद्य विक्रीचे व विजय किसन शिंदे यांचे शेती साहित्य विक्रीची दुकाने आहेत.
रविवारी रात्री नऊ वाजता हे सर्वजण आपली दुकाने बंद करुन घरी गेले. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता फिर्यादी पाटील हे मेडिकल स्टोअर्स उघडण्यासाठी गेले असता, त्याचे शटर उचकटल्याचे त्यांना दिसले. पाहणी केल्यानंतर मेडिकल स्टोअर्समधील बावीस हजार रुपये चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्याच पध्दतीने खांडेकर व शिंदे यांच्या दुकानांचे शटर उचकाटून अनुक्रमे ४ हजार ८०० रुपये व १ हजार ४० रुपये अशी एकूण २७ हजार ४८० रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यावरुन अज्ञात चोरट्यांनी अज्ञात हत्यारांनी दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश करुन चोरी केल्याची तक्रार पाटील यांनी पोलिसांकडे दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.