कामशेतमध्ये सहा दुकाने फोडली ; पोलिसांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:47 PM2018-03-15T17:47:47+5:302018-03-15T17:47:47+5:30
पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकाने फोडण्यात आली आहे.
कामशेत : कामशेत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकानांचे शटर उचकटून सहा दुकाने फोडण्यात आली आहे. तसेच आणखी एका दुकानाचे शटर खोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, एका दुकानदाराने आमच्या दुकानाचे शटर अज्ञात चोरटे तोडत असल्याचा फोन कामशेत पोलीस ठाण्यात कळवूनही पोलिसांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत फोन कट केला. या प्रकरणी दुकानदारांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.
शहरात वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी शहरातील महत्वाच्या पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र,या कॅमेऱ्यांपैकी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एक कॅमेरा सोडला तर सर्व कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(दि. १४) रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास शहरातील पारस परमार (फर्निचर दुकान),आनंद हिंगडे (इलेक्ट्रोनिक दुकान) ,विकास ननावरे (फुट वेअर),सहदेव केदारी (मोबाईल शॉपी),कांतीलाल भाटी (कपड्याचे दुकान) रामलाल प्रजापती (किराणा दुकान)आदींची दुकाने फोडण्यात आली आहे. शटर उचकटत दुकानातील पैसे व किरकोळ सामानाची चोरी करण्यात आली आहे. तर कमल मेन्सवेअर या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न झाला. सर्वच दुकानांतील सुट्टे पैसे चोरीला गेली असून मोबाईल शॉपी मधील जास्त ऐवज चोरीला गेला आहे. सर्व मिळून सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चोरी झाली असल्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवण्यात आली आहे.
संबंधित पोलीस ठाण्यात रात्री घटनेची माहिती देण्याकरता संपर्क केला असता संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणे उत्तरे मिळाली. तसेच घटनास्थळी ते वेळेवर दाखल झाले नाही.तसेच व्यापारी वर्गाने लाखो रुपये देऊन बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे सहा महिन्यांपासून बंद आहेत.वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.