...म्हणून उच्चशिक्षित तरुण करायचा दुचाकी चोऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:47 PM2019-03-13T14:47:33+5:302019-03-13T14:54:29+5:30
नोकरी गमवावी लागल्याने दुचाकी चोरी करणारा तरुण गजाआड करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे. आश्चर्य म्हणजे ही चोरी समोर येऊ नये म्हणून तो त्यातील सुट्ट्या भागांची विक्री करत असे
पुणे : नोकरी गमवावी लागल्याने दुचाकी चोरी करणारा तरुण गजाआड करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे. आश्चर्य म्हणजे ही चोरी समोर येऊ नये म्हणून तो त्यातील सुट्ट्या भागांची विक्री करत असे. शहरातील नाना पेठ भागात अशाच सुट्या भागांची विक्री तयारीत असताना तो पकडला गेला.
या संदर्भात पोलिसांनी गौरव राजकुमार शर्मा (वय ३०, रा. राजमाता कॉलनी, चोरडिया फार्म, कोंढवा खुर्द, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एका हॉटेलमध्ये व्यवस्थापकपदी असलेल्या गौरवला नोकरी गमवावी लागली. त्यातून निर्माण झालेली आर्थिक अडचण मिटवण्यासाठी त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दुचाकी वाहन चोरायचा. पण थेट वाहन विकले तर संशय निर्माण होईल म्हणून चोरलेल्या दुचाकी वाहनांची मोडतोड त्यांची विक्री करत असे. वाहने चोरताना तो बनावट किल्लीचा वापर करत असे.
या प्रकरणात एक व्यक्ती चोरलेल्या गाडीचे पार्ट विकायला नाना पेठेत येणार असल्याची खबर खडक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार फहीम सय्यद आणि आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून गौरवला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने शहराच्या मध्य भागातून २ दुचाकी, वानवडी भागातून २ दुचाकी, भोसरी, पौड भागातून बनावट चावीचा वापर करून दुचाकी लांबविल्याची कबुली दिली.
परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम चक्रे, तसेच उमाजी राठोड, विठ्ठल पाटील, विनोद जाधव, गौरी राजगुरू आदींनी ही कारवाई केली. शर्मा विवाहित असून कर्जबाजारी झाल्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती त्याने दिली आहे.