येरवड्यात तीन ठिकाणी घरफोडी; एकाच घरातून लांबविला ४ लाख ८२ हजारांचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:45 PM2017-11-18T13:45:06+5:302017-11-18T13:46:55+5:30
सदनिकेचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील ४ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे ऐवज लांबविल्याची घटना येरवड्यात घडली. याच भागात आणखी दोन सदनिकांमध्ये चोरी झाली आहे.
पुणे : सदनिकेचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील ४ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे ऐवज लांबविल्याची घटना येरवड्यात घडली. याच भागात आणखी दोन सदनिकांमध्ये चोरी झाली असून, त्यातील नक्की किती ऐवज चोरीला गेला आहे, हे समजू शकले नाही.
फ्रान्सिस बरोटो (वय ४०, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बरोटो यांची नेप्युन सोसायटीत सदनिका आहे. गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी तीन दरम्यान त्यांची सदनिका बंद होती. चोरट्याने कुलुप तोडून कपाटातील रोख २ लाख ५० हजार रुपये, सोन्याचे दागिने असा ४ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. त्यांच्या शेजारील फराह शेख (वय ३०) यांच्या घरात देखील चोरी झाली आहे. मात्र, त्या राजस्थानला गेल्या असल्याने त्यांचा किती ऐवज चोरीला गेला आहे, हे समजू शकले नाही. त्याच बरोबर मिडोज सोसायटीतील टी. श्रीनिवासन यांच्या घरी चोरी झाली आहे. त्यांचा चोरीला गेलेला ऐवज देखील समजू शकला नाही. पोलीस निरीक्षक ए. ए. कदम पुढील तपास करीत आहेत.