राजगुरुनगर येथील क्रीडा संकुल परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:13+5:302021-08-29T04:13:13+5:30
राजगुरुनगर : शहर परिसरात पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा फायदा चोरटे घेऊ लागले असून तिन्हेवाडी रोड क्रीडा संकुल परिसरात ...
राजगुरुनगर : शहर परिसरात पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा फायदा चोरटे घेऊ लागले असून तिन्हेवाडी रोड क्रीडा संकुल परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच या परिसरात तळीरामांचा वावर वाढला असून यांचा त्रास नागरिकांना होत आहे. चोरीच्या घटना थोड्याफार प्रमाणात घडत असल्या तरी मात्र या घटनांची जास्त वाच्यता होत नसल्याने अशा भुरट्या चोरांचे फावत चालले आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तिन्हेवाडी रोड येथील क्रीडा संकुल नेहमी गजबजले असते. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ तरुण, तरुणी, नागरिक, वयोवृद्ध फिरण्यासाठी येतात. मात्र भुरटे चोरटे नागरिकांच्या हातातील मोबाईल, तसेच जे मिळेल ते हिसकावून नेत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी क्रीडा संकुल व कॅनॉलच्या पट्टीवर एक नागरिक फिरण्यास गेला होता. सव्वासातच्या सुमारास अंधार असल्यामुळे त्यांनी मोबाईलची बॅटरी लावून चालत होते. दरम्यान समोरून टू व्हिलरवर तीन जण येऊन त्यातील मागे बसलेल्याने हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी क्रीडा संकुल रस्त्यावरील पुलावर रात्री दहाचे सुमारास एका तरुणास चाकूचा धाक दाखवून सर्व ऎवज काढून देण्यास धमकावले. मात्र तेवढ्यात तिन्हेवाडीकडे जाणारे एक चारचाकी वाहन आल्यामुळे सदरची चोरी टळली, अशा किरकोळ चोरीच्या घटना थोड्याफार प्रमाणात घडलेल्या आहेत. मात्र या घटनांची जास्त वाच्यता होत नाही. चोरट्यांना पळण्यासाठी या रस्त्याने अनेक मार्ग उपलब्ध असल्याने चोरटे त्याचा फायदा उठवितात. अशा भुरट्या चोरांचे फावत चालले आहे. कॅनॉल पट्टीवर व शेतांमध्ये संध्याकाळी सात वाजल्यानंतर दारू पिणाऱ्यांची गर्दी असते. तळीराम दारू पिऊन ग्लास, बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यावर किंवा शेतात टाकतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
संध्याकाळी सातनंतर कॅनॉलच्या रस्त्यावर किंवा शेतात तरुण मुले व मुली चाळे करताना आढळतात. सातकरस्थळ रस्त्याने कॅनॉलकडे गेल्यावर कॅनॉलचा कॉर्नर ते डाक बंगला थिगळस्थळ वस्तीजवळील पुलापर्यंत संध्याकाळी सातनंतर चोरटे, दारूडे व तरुण मुले व मुली यांचा जास्त वावर असतो. यांच्यावर काही वचक बसला नाही तर काही दिवसातच अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी राजेंद्र थिगळे, बी. टी. थिगळे व मोहिंदर थिगळे यांनी केली आहे. शहराची वाढ चौफेर होऊ लागली असली तरी त्या प्रमाणात पोलिसांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना शर्त करावी लागत आहे. पोलिसांकडून रात्रीची गस्त नेहमीच्या ठरावीक मार्गाने घातली जात असल्याने ही गस्त फारशी परिणामकारक ठरत नाही.