पत्नीच्या प्रतिज्ञापत्रामुळे त्यांची मुक्तता
By admin | Published: April 21, 2017 05:59 AM2017-04-21T05:59:38+5:302017-04-21T05:59:38+5:30
जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती देवेंद्र खंडे यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी खंडे यांचेवर कारवाई केल्यानंतर त्यांची पत्नी रूपाली खंडे
नारायणगाव : जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती देवेंद्र खंडे यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी खंडे यांचेवर कारवाई केल्यानंतर त्यांची पत्नी रूपाली खंडे यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून पुरवणी जबाबातील माहिती खोटी असल्याचे म्हटल्याने या मारहाण प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. पत्नीच्या प्रतिज्ञापत्रामुळे न्यायालयाने खंडे यांचा जामीन मंजूर केला असून खंडे यांची जामिनावर मुक्तता झाली आहे़, अशी माहिती खंडे यांचे वकील अॅड़ चंद्रकांत डहाळे यांनी दिली़
जेवण थंड दिले, या कारणावरून देवेंद्र खंडे यांनी पत्नी रूपाली हिला जबर मारहाण केल्याने त्यांचे दोन दात पडले होते. खंडे यांनी जबरदस्तीने स्वत:चे पाय धुवून चार ग्लास पाणी पिण्यास भाग पाडले होते. या क्रुर वागणुकीमुळे त्यांच्या पत्नीने नारायणगाव पोलीस ठाण्यात दि़ २ एप्रिल २०१७ रोजी फिर्याद दिली होती़ त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी खंडे यांचेवर गुन्हा दाखल केला होता़
त्यानंतर दि़ ३ एप्रिल २०१७ रोजी पुरवणी जबाब देऊन पती खंडे यांनी लोखंडी सळईने तोंडावर मारहाण केल्यामुळे दोन दात पडून जबडा फ्रॅक्चर झाल्याचे म्हटले होते़ आधी पोलिसांनी भादंवि ३२५ अन्वये गुन्हा दाखल केला होता़ पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी भादंवि ३२६ अन्वये वाढीव कलम लाऊन खंडे यांना अटक केली होती़ न्यायालयाने खंडे यांना पोलीस कोठडी दिल्याने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती़ १७ एप्रिल २०१७ रोजी रूपाली खंडे या जुन्नर न्यायालयात हजर झाल्या व प्रतिज्ञापत्र देऊन पती खंडे यांनी लोखंडी सळईने मारहाण केलेली नसून जबडा फ्रॅक्चर झालेला नाही़ पोलिसांनी घेतलेला पुरवणी जबाब खोटा असून तो आपल्याला वाचून दाखविलेला नाही, असे प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयास आपले म्हणणे सादर केले़ (वार्ताहर)