Pune Mini Lockdown:...तर दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार: महापालिका आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 05:56 PM2021-04-08T17:56:15+5:302021-04-08T18:08:57+5:30
शासनाचा आदेश आहे त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे.
पुणे: राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गाने भूमिका घेतल्यामुळे महापालिका प्रशासन आणि व्यापारी वर्ग आमनेसामने आले आहेत. महापालिकेचे आयुक्त डॉ.विक्रम कुमार यांनी व्यापारी वर्गाला गर्भित इशारा देताना जे व्यापारी दुकाने उघडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले आहे.
राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज पुणे व्यापारी महासंघाने विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदवला असून शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडे आठ वाजता दुुकाने उघडणार आहे. यावेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी अशा शब्दात खुले आव्हान दिले आहे.
मात्र या भूमिकेविरोधात महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना व्यापारी वर्गाला सरकारी आदेशाचे पालन करण्याची तंबी दिली आहे. शासनाचा आदेश त्याची अंमलबजावणी करणे प्रशासनासह सर्वांची जबाबदारी आहे. मात्र, जे व्यापारी या नियमाचा भंग करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासाठी साठ टीम पाहणी करणार आहे.
.