...तर राज्य सरकार विरोधात आंदोलन उभारणार : अखिल भारतीय किसान सभेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 02:54 PM2021-08-30T14:54:52+5:302021-08-30T14:55:36+5:30
पीक विम्याच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचे झिजले पाय! पुण्यात कृषी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन
पुणे: पीक विम्याचे पैसे मिळावे या पार्श्वभूमीवर पुण्यात कृषी आयुक्त कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत ठिय्या आंदोलनास करत आहे. जर आमच्या पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळाले नाही तर राज्य सरकार विरोधात आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी दिला आहे.
नवले पुढे म्हणाले, आज राज्यातील लाखो शेतकरी पीक विम्याचे पैसे पदरी पडावेत, याच्या प्रतिक्षेत आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ नाही. त्यांना राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यासाठी वेळ आहे. राज्यातील सरकार आणि विरोधी पक्ष देखील अस्तित्वात नाही.
आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेऊन शेतकर्याच्या विमा बाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. टोमॅटोचे भाव अचानक कोसळले. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला. 20 किलोच्या बॉक्सला 50 रुपये भाव मिळतोय. तर एकराचा उत्पादन खर्च दोन लाख रुपये आहे. यामुळे शेतकरी बरबाद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांना आपला टोमॅटो जातो. पणन विभागाला बेजबाबदार मंत्री लाभले आहे. टोमॅटो शेतातून तोडून बाजारात आणेपर्यंत देखील पैसे मिळत नाही. त्यामुळे टॉमेटो रस्त्यावर ओतून देण्याची वेळ आली असल्याचे सरचिटणीस नवले यांनी सांगितले.