... तर नागरिकांचा बँक बॅलन्स खाली होणार : बारामती पोलिसांनी दिला सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 06:49 PM2021-03-17T18:49:51+5:302021-03-17T18:50:14+5:30
पोलिसांनी सोशल मीडियावर देखील याबाबत नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन केले आहे.
बारामती: कोरोनाचे संकट वाढत असताना लसीकरणाच्या नावाखाली ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. त्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर देखील याबाबत नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन केले आहे.त्याकडे दुर्लक्ष करणे नागरिकांना महागात पडणार आहे, अन्यथा त्यांचाचा खिसा रिकामा होणार आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी याबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोना लसीकरणासाठी आलेल्या फोन कॉलला कोणतीही माहिती देऊ नका. रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमचा आधार कार्ड नंबर मागणार, नंतर सांगणार टीपी दिला की तुमचे नाव रजिस्टर होईल. पण चुकूनही अजिबात माहिती सांगू नका. नाहीतर तुमचे बँक बॅलन्स खाली झाले म्हणून समजा.
कोरोना लसीकरणाबाबत कोणतीही शंका असल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घ्या. घाई करू नका. सावध राहा आणि काळजी घ्या. कोणीही तुमच्या फायद्यासाठी येत नाही, त्यामध्ये समोरच्याचा फायदा असतो. त्यामुळे कोणीही अशा फसवणुकीला बळी पडू नका,असे आवाहन शिरगांवकर यांनी केले आहे.