...तर बिऱ्हाड मोर्चा काढणार
By Admin | Published: July 6, 2017 02:32 AM2017-07-06T02:32:29+5:302017-07-06T02:32:29+5:30
भोर तालुक्यातील कातकरी समजाच्या घरकुलांची प्रलंबित कामे तात्काळपूर्ण करण्यात यावीत; अन्यथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : भोर तालुक्यातील कातकरी समजाच्या घरकुलांची प्रलंबित कामे तात्काळपूर्ण करण्यात यावीत; अन्यथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयात तमाम कातकरी बांधवांच्या वतीने बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आदिवासी समाज कृती समाज समितीचे अध्यक्ष सीताराम जोशी यांनी दिला आहे.
गेले कित्येक दिवस प्रलंबित असलेला भोर तालुक्यातील कातकरी बांधवांना अजूनही हक्काचे घर न मिळाल्यामुळे ही कुटुंबे पडत्या पावसात दिवस काढत आहेत. या घरकुलांची कामे पावसाळ्याअगोदर पूर्ण व्हावीत, यासाठी हुतात्मा नाग्या कातकरी समाज संघटना भोरच्या वतीने घोडेगाव प्रकल्प अधिकारी यांना २८ फेब्रुवारी २०१७ रोजी निवेदन देण्यात आले. याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आदिवासी समाज कृती समिती पुणे अध्यक्ष सीताराम जोशी यांच्या पुढाकाराने २९-३-२०१७ रोजी प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले. यादरम्यान प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे यांनी जोशी व भोर येथील कार्यालयामध्ये बोलावून पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मेपर्यंत संबंधित घरकुलांची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले. या घरांच्या चौकशीसाठी भोर येथे प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी पाठवून संघटनेचे पदाधिकारी, लाभार्थी व घरकुलांचे बांधकाम करणारा ठेकेदार यांच्याशी चर्चा करून ३१ मेपर्यंत घरकुलांची कामे पूर्ण करण्याचा अहवाल घोडेगाव प्रकल्प कार्यालयाकडे मागविण्यात आला आला. यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. यानंतर पुन्हा १५ जून रोजी प्रकल्प अधिकारी सोनकवडे व निरीक्षक खंडारे यांनी अध्यक्ष जोशी यांना राजपूर येथील आश्रमशाळेत भेटून तत्काळ घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
परंतु, अद्यापही ही कुटुंबे पावसात दिवस काढत आहेत. सध्या यामध्ये टिटेघर येथील ९ लाभार्थी असून ५ घरांवर पत्रे टाकले. ३ घरे बिगर पत्र्यांची व १ घराचे पायाचे काम झाले आहे. करंजे या गावातील ६ लाभार्थी असून येथील फक्त पायांचे काम झाले असून संपूर्ण घरे उघड्यावर आहेत वडगाव डाळ येथील ९ घरकुले आहेत. यामध्ये ८ घरांवर वरपत्रे टाकले असून १ घराचे फक्त फाउंडेशन केले आहे. कासुर्डी येथील ४ घरकुले मंजूर असून या घरांचे वीटकाम पूर्ण झाले असून बाकी अपूर्ण अवस्थेत आहेत. माळेगाव येथील ५ लाभार्थी असून ही पाचही घरे अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा एकूण ३३ कुटुंबांना उघड्यावर राहावे लागत आहे.
घोडेगाव प्रकल्प अधिकारी याबाबत वारंवार आश्वासने देत आहेत. या प्रकल्प कार्यालयाकडून कातकरी बांधवांना का वेठीस धरले जात आहे? तत्काळ ही घरकुलांची उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावीत; अन्यथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथे हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी समाज संघटनेच्या वतीने या कार्यालयामध्ये चुली पेटवून बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येईल.
याला जबाबदार कोण?
आदिवासी समाजकृती समिती पुणे अध्यक्ष सीताराम जोशी म्हणाले, की सध्या भोर तालुक्यातील या भागामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून ही कातकरी समाजाची कुटुंबे उघड्यावर राहत आहेत. कासुर्डी येथील कुटुंब जवळच असणाऱ्या मंदिराचा आधार घेत आहेद. प्रशासनाने तत्काळ कासुर्डी व माळेगाव येथील ९ घरकुलांची कामे पूर्ण केल्यास या इतर कुटुंबांना तात्पुरते येथे स्थलांतरित करण्यात येतील. कोणतीही दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण?