...तर शहराच्या विकासाला ब्रेक

By admin | Published: April 22, 2017 04:03 AM2017-04-22T04:03:09+5:302017-04-22T04:03:09+5:30

भाजप बहुमताच्या जोरावर विरोधकांना विश्वासात न घेता संकुचित विचाराने काम करत आहे. यामुळे भविष्यात शहराच्या विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे

... then break the city's development | ...तर शहराच्या विकासाला ब्रेक

...तर शहराच्या विकासाला ब्रेक

Next

पुणे : भाजप बहुमताच्या जोरावर विरोधकांना विश्वासात न घेता संकुचित विचाराने काम करत आहे. यामुळे भविष्यात शहराच्या विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासाच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहराध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी येथे केले.
महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपाने बहुमताच्या जोरावर तब्बल ३५ टक्के अधिक दराची निविदा असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रस्ताव मान्य केला. या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, केंद्राच्या निधीतून कात्रज ते फुरसुंगी या संपूर्ण बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण होत असले तर त्याचे स्वागतच करू, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. या वेळी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते चेतन तुपे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाल्या, की राष्ट्रवादी काँगे्रसची दहा वर्षे महापालिकेमध्ये सत्ता होती. निवडणुका सोडल्यास आमच्या पक्षाने सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊनच सभागृहात काम केले आहे. याची कल्पना भाजपलाही आहे. परंतु नुकतेच सत्तेत आलेल्या भाजपाने विरोधी पक्षांना विश्वासात घेणे तर दूरच; परंतु सभागृहातील बसण्याच्या जागांचे वाटप, सभागृहात बोलू न देणे असे संकुचित वृत्तीचे राजकारण केले आहे. यामुळे प्रशासनावर अंकुश राहणार नाही आणि शहराच्या विकासाला खीळ बसेल.
(प्रतिनिधी)

कात्रज चौकात सोमवारी राष्ट्रवादीचे आंदोलन
सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आता सांगताहेत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करून केंद्राच्या निधीतून त्याचा विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असे होते तर भिमाले यांनी सभागृहातच सांगायला हवे होते. या ठिकाणी पादचारी भुयारी मार्गासह वाहतूक सुधारणेसाठी आवश्यक ती कामे करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका अमृता बाबर, पक्षाचे पदाधिकारी नमेश बाबर यांच्या नेतृत्वाखाली २४ एप्रिलला या चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण आणि चेतन तुपे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे पक्षीय राजकारण : टिळेकर
शहराचा बाह्यवळण रस्ता असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती वाढली आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वारंवार अपघात होत आहेत. यामुळे या रस्त्यांसाठी गेल्या वीस वर्षांपासून आम्ही तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस झगटत होतो. वेळोवेळी मागणी करुन देखील या रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुरेसा निधी टाकला नाही. यासाठी अनेक आदोलने केली त्यानंतर तुटपुंजी तरतुद करण्यात आली. आता विरोधक म्हणून बोलत असलेल्या याच राष्ट्रवादी काँग्रेसने अभियात्रिकी पुले ते पाटील इस्टेट दरम्यानचा उडाण पुलाची निविदा तब्बल ३५. ११ टक्के वाढीव दराने व शिवणे ते म्हात्रे पुल व संगमवाडी ते खराडी नदी काठचा रस्ता डिफर्ड पेमेंट पध्दतीने विकसित करण्यासाठी १८ टक्के वाढीव दराच्या निविदा मंजूर केल्या आहेत.

Web Title: ... then break the city's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.