...मग घरी आणून द्या स्लिप
By admin | Published: October 15, 2014 05:17 AM2014-10-15T05:17:27+5:302014-10-15T05:17:27+5:30
आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, हे पाहण्यासाठी एक महिला शाळेत येते, यादीत नाव असल्याचे दाखविल्यानंतर तेथील शिक्षिका त्यांना आता आला आहात
पुणे : आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, हे पाहण्यासाठी एक महिला शाळेत येते, यादीत नाव असल्याचे दाखविल्यानंतर तेथील शिक्षिका त्यांना आता आला आहात, तर मतदान स्लिप घेऊन जा, असे म्हणून त्यांच्या घरातील सर्व लोकांच्या स्लिपची यादी तिच्यासमोर धरते, त्यावर या महिलेचे उत्तर ऐकून ती शिक्षिकाच चाट पडते़ ती महिला म्हणते, तुम्हाला घरी जाऊन स्लिप वाटायला सांगितले आहे ना, मग घरी आणून द्या, मी घेऊन जाणार नाही़
निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना मतदान स्लिपा प्रत्येकाच्या घरी जाऊन देण्याचा आदेश दिला आहे़ एकेका शिक्षक, शिक्षिकांकडे जवळपास एक हजार व त्याहून अधिक मतदार स्लिपा देण्यात आल्या आहेत़ पण, अनेक ठिकाणी त्यांची मतदारांकडून अडवणूक होत असल्याने हे शिक्षक वैतागले आहेत़ त्यांच्या समस्यांकडे लक्ष सोडा; पण त्या ऐकून घेण्याची कोणाची तयारी नाही़ फक्त स्लिपा वाटून झाल्या की नाही, इतकेच विचारले जात आहे़ शहरी भागात हा मोठा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहे़
निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप होते़ याचा सर्वत्र बोलबाला आहे़ त्याचाही स्लिपा वाटण्यास गेलेल्या महिलांना त्रास सहन करावा लागतो़ या महिला एखाद्या झोपडपट्टीत गेल्या आणि तेथे त्यांनी नावे विचारून स्लिपा देण्यास सुरुवात केली, त्यांना पहिला प्रश्न विचारला जातो, किती पैसे आणलेत़ आम्ही सरकारी कर्मचारी आहोत, पैसे नाही स्लिपा वाटतोय, असे सांगितल्यावर त्यांच्याकडून मग तुमचा काय उपयोग, असे उत्तर येते़ अनेकदा घरे बंद असतात, पण, शेजाऱ्यांकडून स्लिपा घेतल्या जात नाही़ तुम्ही ते घरी आल्यावर पुन्हा या़ घरी कधी असतात, असे विचारले तर आम्हाला माहिती नाही, अशी उत्तरे दिली जातात़ त्यामुळे एका इमारतीत दोनदा तीन-चार जिने चढून जाण्याची वेळ येत असल्याचे या शिक्षिकांनी सांगितले़
ज्यांनी स्थलांतर केले आहे, अशांची लोकसभा निवडणुकीत नावे वगळली गेली होती़ त्यांनी पुन्हा जुन्याच मतदारसंघात आपली नावनोंदणी केली आहे़ पण, सध्या ते तेथे राहत नसल्याचे या शिक्षकांना आढळून आले आहे़ त्यामुळे त्यांना स्लिपा कोठे नेऊन द्यायच्या हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे़ (प्रतिनिधी)०