..तर अत्यवस्थ कोरोना रुग्णांची 'मृत्यू'च्या दाढेतून होणार सुटका;'टास्क फोर्स'ने सुचविलेल्या औषधाचा पालिकेकडून'प्रयोग'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 06:00 AM2020-05-24T06:00:00+5:302020-05-25T13:52:55+5:30
रुग्णांना दिलासा देण्याकरिता तसेच मृत्यूदर कमी करण्याकरिता हा प्रयोग केला जाणार असून दिले जाणारे औषध महागडे आहे...
लक्ष्मण मोरे -
पुणे : कोरोनामुळे देशभरात रुग्ण वाढत आहेत तसेच अत्यवस्थ रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोरोनामुळे होऊ शकणारे संभाव्य मृत्यू टाळण्याकरिता महापालिका रविवारी 'प्रयोग' करण्यात आला असून ससून रुग्णालयातील २५ अत्यवस्थ रुग्णांवर 'टोसिलीझुमाब' या औषधाची चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी यशस्वी ठरली तर अत्यवस्थ रूग्णांना मृत्यूच्या दाढेतून वाचविणे शक्य होऊ शकणार आहे.
शहरात ९ मार्च रोजी राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णवाढीचा आलेख वाढताच राहिलेला आहे. शहरातील रुग्णसंख्या शुक्रवारपर्यंत ४ हजार ३९८ पर्यन्त जाऊन पोचली आहे. तर, कोरोनामुळे शहरात तब्बल २४२ मृत्यू झाले आहेत. हा आकडा भविष्यात वाढणार आहे. रुग्ण वाढू नयेत, अधिकाधिक तपासण्याकरून पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर काढण्याच्यादृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक स्वच्छतेसह प्रतिबंधात्मक उपाययोजनावरही भर दिला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने डॉक्टरांची 'टास्क फोर्स' तयार केली आहे. या समितीने या औषधाचा प्रयोग करण्याबाबत सुचविले आहे. तसे लेखी स्वरूपात पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. यांसदर्भात विचार करून पालिकेने अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्याचे ठरविले आहे.
ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ अत्यवस्थ रूग्णांवर ही चाचणी केली जात आहे. त्याचा खर्च महापालिका करणार आहे. रुग्णांना दिलासा देण्याकरिता तसेच मृत्यूदर कमी करण्याकरिता हा प्रयोग केला जाणार असून दिले जाणारे औषध महागडे आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास अत्यवस्थ रुग्णांना मोठा फायदा मिळू शकणार आहे. या औषधामुळे फुफ्फुसातील सूज कमी करून श्वसन प्रक्रिया सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.
--------
गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबई महापालिकेने या औषधाच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. हे औषध प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करते. तसेच फुफ्फुसातील संसर्ग कमी होण्यासाठीही मदत करते. प्रत्येक रुग्णाला या औषधाचे दोन डोस दिले जाणार आहेत. एका डोसची किंमत २० हजार रुपये आहे. या औषधाचे कोणतेही 'साईड इफेक्ट' रुग्णावर होणार नाहीत.
---------
कसे काम करते 'टोसिलीझुमाब'
हे औषध ' ह्युमनाईज्ड मोनोक्लोनल अँटिबॉडी' आहे. हे औषध रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे आहे. शरीरावर जखम अथवा मारामुळे येणारी सूज आणि दुखणे (इन्फलमेशन) यावर हे औषध प्रभावीपणे काम करते. सुजेच्या/जखमेच्या ठिकाणी शरीरात होणा?्या रासायनिक बदलावर हे औषध परिणाम करते. त्यामुळे इन्फलमेशन होत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या फुफ्फुसातही सूज येते. त्याची श्वसन क्षमता कमी होते. त्यामुळे असे रुग्ण अत्यवस्थ होतात. हे औषध फुफ्फुसात आलेली सूज कमी करून श्वसन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मदतशीर ठरू शकते.
-----------
पालिकेकडून तसेच शासनाकडून शहरात रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्याकरिता मोठया प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. जे जे करणे शक्य होते ते सर्व केले जात आहे. सध्या कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखणे आणि अत्यवस्थ रूग्णांचे मृत्यू कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने ससून रुग्णालयातील २५ रूग्णांवर या औषधाचा प्रयोग केला जाणार आहे. हे औषध महागडे असून त्याचा खर्च महापालिका करणार आहे. - शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका