...तोवर सरकार आले तर चांगलेच होईल : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 08:22 PM2019-12-25T20:22:11+5:302019-12-25T20:24:10+5:30
’हिंदू’ शब्दावर अनेकांचा आक्षेप आहे. पण हा शब्द कुणालाच कळला नाही.
पुणे : पुढील वर्षभरात काश्मिरी मुलींना शिक्षणासाठी पुण्यात आणण्याकरिता सरहदकडून प्रयत्न केले जात आहेत. या मुलींच्या शिक्षणाचा सर्व खर्च लोकसहभागातून केला जाईल, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. ’तोवर सरकार आले तर चांगलेच होईल’ अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.
सरहदद कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँंड सायन्स, कात्रज च्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ग्रंथालय तसेच काश्मीर महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सचिव राजेश पांडे, अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल ( निवृत्त) विनायक पाटणकर तसेच सरहद चे संजय नहार, शैलेश पगारिया, युवराज शहा उपस्थित होते.
संजय नहार यांनी प्रास्ताविकात पुढील वर्षभरात काश्मिरी मुलींना पुण्यात शिक्षणासाठी आणायची इच्छा प्रदर्शित केली. तोच धागा पकडत चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकार गेले तरी ताकद खूप आहे. मात्र सरकार असतं तर कार्याचा विस्तार खूप मोठा असता. सरहदद पुढील वर्षभरात काश्मिरी मुलींना पुण्यात शिक्षणासाठी आणू इच्छित आहे. त्यांच्या शिक्षणाचा खर्च लोकसहभागातून केला जाईल.
’हिंदू’ शब्दावर अनेकांचा आक्षेप आहे. पण हा शब्द कुणालाच कळला नाही. जो आम्हाला अटलबिहारी वाजपेयीजींकडून कळला. ’हिंदू’ म्हणजे एक व्यवहार आहे. सर्व धर्मीय हे व्यवहाराने हिंदू आहेत. म्हणून हे हिंदू राष्ट्र आहे. मग आक्षेप का? तेच कळत नाही असे पाटील यांनी सांगितले.
विनायक पाटणकर यांनी समाजाची शक्ती त्याचा सांस्कृतिक वारसा असते. काश्मिरीयत जिवंत आहे. तोपर्यंत काश्मीरला कुणीही आपल्यापासून हिरावू शकणार नसल्याचे सांगितले.
झायद भट यांनी सूत्रसंचालन केले.