'...तेव्हा नमस्कार केला' युतीच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:34 IST2025-01-30T15:12:29+5:302025-01-30T15:34:44+5:30
अलीकडे कुणाला मित्र म्हणताना भीती वाटते…प्रेसवाले त्याचा काय अर्थ घेतील.

'...तेव्हा नमस्कार केला' युतीच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं
पुणे - भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात ही भेट घडली होती. या भेटीनंतर माध्यमांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
अशातच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “अलीकडे कुणाला मित्र म्हणताना भीती वाटते…प्रेसवाले त्याचा काय अर्थ घेतील.” ते पुढे म्हणाले, “काल पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. त्यावेळी उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते…मी वर चढत होतो. समोरासमोर आले तेव्हा नमस्कार केला…” त्यांनी माध्यमांमध्ये होणाऱ्या चर्चेबद्दलही टिप्पणी केली की, “आता दुसरी बातमी येईपर्यंत ते चालतील की आम्ही दोघे भेटलो आता काय होणार?” असा प्रश्नही माझ्या मनामध्ये आला होता. असं म्हणत त्यांनी युतीच्या चर्चांवर पूर्णविराम लावला
ते पुढे बोलतांना म्हणाले,'अरविंद सावंत माझे खूप जुने मित्र खरंतर त्यांना मित्र म्हटल्यामुळे काय काय होणार आज दिवसभरात मला माहिती नाही. पण आम्ही एका परिसरात वाढलो मुंबईच्या गिरण गावात वाढलो.'
दरम्यान, या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “लग्नात भेटल्यामुळे युती होते किंवा पक्ष जवळ येतात, इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये.”या प्रसंगानंतर राजकीय वर्तुळात भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.