...तो फिर इससे पहले क्या मैं बदमाश था?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:58+5:302021-07-10T04:08:58+5:30
बारामती : लोग कहते है मैं शरीफ हो गया, तो फिर इससे पहले क्या मै बदमाश ...
बारामती : लोग कहते है मैं शरीफ हो गया, तो फिर इससे पहले क्या मै बदमाश था? या डायलॉगने त्या काळात सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी बारामतीकरांची मने जिंकली होती, अशी आठवण ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.
दिलीपकुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर बारामतीकरांनी दिलीपकुमार यांच्याशी संबंधित आठवणी सोशल मीडियावर ‘शेअर’ करीत त्यांचे बारामतीकरांशी असणारे ऋणानुबंध उघड केले आहेत. या पार्श्वभुमीवर गुजर यांनी बोलताना काही पैलू उलगडले. गुजर म्हणाले, तो काळ साधारण सन १९७० ते १९८० च्या दशकातीलमधील होता. बारामतीमध्ये शरद पवारांच्या निवडणूक प्रचारासाठी दिलीपकुमार आले होते. त्या काळात दिलीपकुमार मुंबईचे ‘शरीफ’ झाले होते. या काळात तत्कालीन नगरसेवक अजिज बागवान यांच्या एका कार्यक्रमासाठी देखील गेले होते. त्या वेळी बोलताना ‘‘लोग कहते है मैं शरीफ हो गया, तो फिर इससे पहले क्या मै बदमाश था’’, या संवादाने त्यांनी बारामतीकरांची मने जिंकली होती. त्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणात नव्हते, त्यांची त्यावेळी नुकतीच कारकिर्द सुरू झाली होती. अजित पवार देखील दिलीपकुमार यांचे चाहते होते, दिलीपकुमार यांच्याबरोबर ‘अजितदादां’सह आम्ही दोघांनी छायाचित्र काढल्याची आठवण गुजर यांनी सांगितली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा चित्रपटसृष्टीतील अनेकांचा स्नेह आहे. पवार यांच्या मैत्रीमुळे बारामतीला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. पवार यांच्या निवडणुकीच्या प्रचारासह बारामतीत विविध कार्यक्रमांमध्ये दिलीपकुमार यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांची दुर्मिळ छायाचित्र पोस्ट केली आहेत. येथील छायाचित्रकार गिरीश काळे यांचे वडील गंगाधर काळे देखील जुन्या काळातील प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. गिरीश काळे यांनी देखील सोशल मीडियावर त्या काळातील बारामती शहरातील कॉटन मार्केट म्हणजे सध्याच्या शारदा प्रांगणातील १९७७ साली दिलीपकुमार यांच्यासमवेत माळेगाव कारखान्याचे तत्कालीन चेअरमन कै. एस. एस. हिरेमठ आणि गंगाधर काळे यांचे छायाचित्र ‘शेअर’ केले आहे.
शरद पवार यांचा दिलीपकुमार आणि त्यांच्या परिवाराशी स्नेह घट्ट होता. दिलीपकुमार रुग्णालयात दाखल असताना मध्यंतरीच्या काळात मुंबईत रुग्णालयामध्ये जाऊन शरद पवार यांनी त्यांच्या आरोग्याची चौकशी केली होती. तसेच दिलीपकुमार यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या घरी जात कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच दिलीपकुमार यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते पवार यांच्या मैत्रीचे धागे उलगडणारे छायाचित्र देखील खासदार सुळे यांनी सोशल मीडियावर ‘पोस्ट’ केला आहे. पवार हे मुख्यमंत्री असताना एका कार्यक्रमात दिलीपकुमार आणि राजेंद्रकुमार एकत्र असतानाचे हे छायाचित्र आहे.
————————————————
दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांनी बारामतीला भेट दिली होती. यावेळी अजित पवार आणि किरण गुजर यांच्यासमवेत काढलेले संग्रहित छायाचित्र.
०९०६२०२१ बारामती—०६