"...तर मी इंदापूर नगरपरिषदेसमोर उपोषणास बसेन" खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 03:38 PM2023-11-25T15:38:48+5:302023-11-25T15:40:06+5:30
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना खा.सुळे म्हणाल्या की, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत...
इंदापूर (पुणे) : ‘नगरपरिषद बेकायदेशीर कराच्या माध्यमातून इंदापूरकरांची पिळवणूक करत असेल तर गय केली जाणार नाही. गरज पडल्यास मी नगरपरिषदेसमोर उपोषणास बसेन', असा सज्जड इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी भ्रमणध्वनीवरून इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना दिला.
इंदापूरकरांच्या सामाजिक,सार्वजनिक समस्यांकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रा. कृष्णा ताटे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २३५ दिवसांपासून नगरपरिषदेच्या प्रांगणात धरणे आंदोलनास बसलेल्या इंदापूर शहर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती कथन केली. त्यानंतर त्या मुख्याधिकाऱ्यांशी बोलल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने या वेळी उपस्थित होते.
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना खा.सुळे म्हणाल्या की, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत. इंदापूरकरांच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावण्यात येईल. इंदापूरकरांचे प्रश्न सोडवले धरणे आंदोलन प्रकरणाची आपण सखोल माहिती घेतलेली आहे. त्याच्या आधारे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रा.कृष्णा ताटे, हमीदभाई सय्यद, महादेव चव्हाण, संतोष जामदार,रमेश शिंदे, संदिपान कडवळे, जयवंत नायकुडे, राजेंद्र हजारे, अशोक पोळ, अस्लमभाई बागवान, अश्पाक इनामदार, अर्जुन शिंदे, रघुनाथ खरवडे, अभिषेक लोंढे, हाजी सलीमभाई बागवान, प्रा. बाळासाहेब मखरे, फकीरभाई पठाण, रमेश राऊत, श्रीकांत मखरे, अभिषेक लोंढे, सुनील मखरे, आरिफभाई जमादार, जाकिर मोमीन, परमेश्वर काळे यासह अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.