... तर मानवजातच संकटात येईल: सदानंद मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:48+5:302021-07-11T04:09:48+5:30
पुणे: मानव संस्कृती आणि निसर्ग प्रकृती हे दोन्ही घटक एकमेकांशी तादात्म्य पावलेले असले तरी संस्कृती आणि प्रकृती यांच्यातील संघर्ष ...
पुणे: मानव संस्कृती आणि निसर्ग प्रकृती हे दोन्ही घटक एकमेकांशी तादात्म्य पावलेले असले तरी संस्कृती आणि प्रकृती यांच्यातील संघर्ष हा नवनिर्मितीचा गाभा राहिलेला आहे. मानव संस्कृतीने निसर्ग प्रकृतीशी इतर नैसर्गिक घटकांप्रमाणे जुळवून न घेता उलट त्याच्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला तर मानवजातच संकटात येईल, असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य,संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून कालिदास यांनी रचलेल्या ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा मराठीतील अनुवाद 'ऋतुसंहार...एक रसानुवाद' या डॉ. ज्योती रहाळकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होेते.
यावेळी सिग्नेट पब्लिकेशन्सचे अॅड.प्रमोद आडकर, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले,महाकवी कालिदास यांच्या काव्याचा श्रृंगार हा स्थायी भाव आणि स्थायीरस राहिलेला दिसून येतो. यासाठी त्यांना अनेकदा टीकेचे धनी देखील व्हायला लागले. अनेक श्रेष्ठतम कवींनी कालिदासांच्या दुस-याच्या श्रृंगाराचे मर्यादेपलीकडे जाऊन केलेले वर्णन हे औचित्य भंगाचा भाग मानला आहे. कालिदासांच्या कवी म्हणून असलेल्या श्रेष्ठते बाबत सर्वमान्यता होती. ते सिद्धहस्त महाकवी होते. त्यांच्या काव्याचा आवाका फार मोठा होता. त्यांच्या काव्याचे मूळ वेदांपासून इतिहासांच्या पानांपर्यंत सापडते. मेघदूत हे महाकाव्य तर कालिदासांच्या कल्पनाविलास निमीर्तीचा मापदंड म्हणावा लागेल.
ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर आणि लेखिका डॉ. ज्योती रहाळकर, प्रमोद आडकर यांनी मनोगत व्यक्त केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.