...तर मनविसे विद्यार्थिनींना लाठ्या-काठ्या वाटप करेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:49 PM2019-12-23T15:49:29+5:302019-12-23T15:50:34+5:30
महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी विविध समित्या स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या समित्या स्थापन न झाल्यास विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देणार असल्याचे मनविसेकडून सांगण्यात आले आहे.
पुणे : शाळा- महाविद्यालये, सतेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या उपाययाेजनांसाठी विशाखा समिती तसेच पाेस्काे व पाॅश कायद्यांतर्गत समितीची स्थापना करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. याची अंमलबजावणी न झाल्यास विद्यार्थिनींना स्व- संरक्षणासाठी लाठ्या-काठ्या वाटप करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) दिला आहे.
देशभरात विद्यार्थिनी, युवती व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या उपाययोजनेची असणाऱ्या विविध समित्या कार्यान्वित नसल्याचे लक्षात आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर ने याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालय तसेच उच्च शिक्षण विभागाकडे शाळा, महाविद्यालय तसेच विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी तातडीने '' विशाखा '' समिती तसेच पाेस्काे व पाॅश समितीची स्थापना करून कार्यान्वित करण्याबाबतची आग्रही मागणी केली होती. मनविसेच्या या मागणीची दाखल घेऊन या समित्या कार्यान्वित करण्याबाबतचे आदेश देखील देण्यात आले आहेत. १५ दिवसांमध्ये या सर्व समित्या कार्यान्वित करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आलेले आहेत.
मात्र १५ दिवसांमध्ये जर '' विशाखा '' तसेच पाेस्काे व पाॅश समितीची स्थापना होऊन त्या कार्यान्वित न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जाऊन आमच्या विद्यार्थिनी भगिनींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना '' स्व - रक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम सुरु करणार '' तसेच विद्यार्थिनींना लाठ्या - काठ्या वाटप देखील करणार आहे. असे मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.