...तर करारनामा रद्द होणार", पुण्यातील खासगी रुग्णालयांना आरोग्यप्रमुखांनी सुनावले

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 5, 2022 11:11 AM2022-08-05T11:11:10+5:302022-08-05T11:11:19+5:30

गेल्या काही वर्षात या रुग्णालयांकडून गरीब रुग्णांवर ''फ्री बेड''द्वारे पुरेसे उपचार होत नसल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले

then the agreement will be cancelled said the health chief to the private hospitals in Pune | ...तर करारनामा रद्द होणार", पुण्यातील खासगी रुग्णालयांना आरोग्यप्रमुखांनी सुनावले

...तर करारनामा रद्द होणार", पुण्यातील खासगी रुग्णालयांना आरोग्यप्रमुखांनी सुनावले

googlenewsNext

पुणे : मनपाची जागा, अतिरिक्त मजले बांधण्याची परवानगी (एफएसआय) अशी सूट देऊन इमले बांधलेल्या शहरातील चार खासगी रुग्णालयांनी दररोज ठराविक बेड गरिबांच्या मोफत उपचारांसाठी द्यायचे आहेत. रुग्णालयांनी अशा रुग्णांकडून पैसे आकारले किंवा उपचार द्यायचे नाकारले, तर त्यांच्यासोबतचा झालेला करारनामा रद्द करण्यात येईल. तसेच या रुग्णांच्या उपचारांचे ट्रॅकिंग करा, असे निर्देश आरोग्यप्रमुखांनी दिले आहेत.

जे रुग्ण पुण्यातील रहिवासी आहेत, तसा त्यांच्याकडे पुरावा आहे व ज्या रुग्णाचे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा ज्यांचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशा पात्र रुग्णांनी महापालिकेच्या आरोग्य विभागात जाऊन मोफत उपचारांचे पत्र घेतल्यास त्यांच्यावर पुण्यातील डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटल, पुणे स्टेशन येथील रुबी हॉल क्लिनिक, औंधमधील एम्स हॉस्पिटल आणि कोरेगाव पार्क येथील केकेआय इन्स्टिट्यूट येथे विशिष्ट प्रकारचे मोफत उपचार करण्याची तरतूद आहे.

मात्र, गेल्या काही वर्षात या रुग्णालयांकडून गरीब रुग्णांवर ''फ्री बेड''द्वारे पुरेसे उपचार होत नसल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले. गेल्या काही वर्षांमध्ये फार थोड्या रुग्णांवर मोफत उपचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडून त्यांना मोफत उपचाराचे पत्र दिले होते. परंतु त्यांना उपचार दिले का नाही ? याचे ट्रॅकिंग होत नव्हते. आता मात्र याचे ट्रॅकिंग करण्याचे तसेच विभागीय क्षेत्रीय कार्यालयात त्याची माहिती लावण्याचे निर्देश मनपाचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे आता गोरगरीब रुग्णांना उपचार मिळतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती ‘फ्री बेड’

सह्याद्री हाॅस्पिटल, डेक्कन :

- पाच बेड आरक्षित, जनरल वाॅर्डमध्ये (आंतररुग्ण विभागात).
- शस्त्रक्रिया वगळता वैद्यकीय उपचार (मेडिकल मॅनेजमेंट) करायचे आहे.

रुबी हाॅल क्लिनिक, पुणे स्टेशन :

- १२ बेड, जनरल वॉर्ड, मेडिकल मॅनेजमेंटचे रुग्ण

एम्स हॉस्पिटल, औंध :

- आठ बेड जनरल वॉर्ड, मेडिकल मॅनेजमेंट उपचारांचे रुग्ण.
- कार्डिऑलॉजी व कार्डिक सर्जरी विभाग वगळता इतर उपचारांसाठी, यामध्ये कन्सल्टिंग चार्ज, आयसीयू व ऑपरेटिव्ह चार्जवर १०० टक्के सवलत.

के. के. आय. इन्स्टिट्यूट, बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क.

- ९ बेड, केवळ डाेळ्यांच्या उपचारासाठी

हे आहेत नियम :

- या बेडवर जास्तीत जास्त २१ दिवसांपर्यंत शस्त्रक्रिया वगळता वैद्यकीय उपचार माेफत.
- बिलाची मर्यादा नाही.
- प्रतिदिनी हे बेड रिकामे किंवा गरीब रुग्णांनी भरलेले हवेत.

कोण आहे पात्र -

पुण्यातील रहिवाशी असावा. तसा पुरावा असावा. पिवळे रेशनकार्डधारक किंवा एक लाखाच्या आतील उत्पन्न असलेले रुग्ण. रुग्ण त्यांच्या नातेवाइकांनी कागदपत्रे घेऊन महापालिकेच्या आराेग्य विभागातील प्रमुखांकडे जावे. आराेग्य विभागप्रमुखांकडून माेफत उपचाराचे पत्र घ्यावे व संबंधित रुग्णालयात उपचारासाठी जावे. उपचारांचा लाभ दिला नसल्यास पुन्हा त्यांची तक्रार आराेग्य विभागाकडे करावी.

Web Title: then the agreement will be cancelled said the health chief to the private hospitals in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.