...तर मिळकत कर हाेणार तीनपट! कुणाला लागू राहणार हा तीनपट मिळकत कर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 02:29 PM2022-06-29T14:29:03+5:302022-06-29T14:30:01+5:30
महापालिका आयुक्त विक्रम कुमारांचे आदेश...
पुणे : शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आदी मिळकतींमधील साइड मार्जिनमध्ये (मिळकतीलगतच्या रिकाम्या जागेत) अनेक छोटे-मोठे व्यावसायिक सर्रासपणे व्यवसाय करीत आहेत. अशाप्रकारे साइड मार्जिनचा वापर करून उत्पन्न घेणाऱ्या मिळकतींकडून तीनपट मिळकत कर वसूल करावा, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
याबाबतचे महापालिका आयुक्त यांच्या सहीचे कार्यालयीन आदेश करआकारणी व कर संकलन विभागाने जारी केले आहेत. सध्या महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामे, टेरेसवरील हॉटेल आणि साइड मार्जिनमधील बांधकामे यांच्यावर कारवाई सुरू आहे. आता साइड मार्जिनमधील अनधिकृतपणे व्यवसाय अथवा अन्य वापरासाठी जागेचा वापर होत असलेल्या मिळकतींना तत्काळ तीनपट बिगरनिवासी मिळकत कर आकारणी करून दंडही आकारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शहरातील साइड मार्जिनचा अनधिकृत वापर कमी होण्यास मदत होणार आहे.
अनधिकृत बांधकामांना महापालिका मिळकत कराची आकारणी करते, मात्र अशी बांधकामे नियमित होत नाहीत. त्याचप्रमाणे हा नियम इमारतीच्या साइड मार्जिनमधील अनधिकृत वापरालाही लागू होणार आहे. महापालिका प्रशासनाने या मिळकतीला मिळकत कर लावला तरी त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार महापालिका प्रशासनाकडे असणार आहे.
यांना लागू राहणार हा तीनपट मिळकत कर
- मिळकतीतील ओपन टू स्काय टेरेसचा वापर करणारे
- हॉटेल, रेस्टॉरंट आदीच्या साइड मार्जिनचा अन्य व्यवसाय होत असल्यास
- मिळकतीतील पार्किंगमध्ये बिगरनिवासी वापर चालू असल्यास
- टॉयलेट, वॉशरूम व वापरात बदल केलेल्या मिळकती