...तर ओबीसी आरक्षणासाठी लढावेच लागेल -भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 AM2020-11-29T04:05:19+5:302020-11-29T04:05:19+5:30

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असो की, फडणवीस सरकार आम्ही मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. मात्र, मराठा समाजातील ...

... then we have to fight for OBC reservation - Bhujbal | ...तर ओबीसी आरक्षणासाठी लढावेच लागेल -भुजबळ

...तर ओबीसी आरक्षणासाठी लढावेच लागेल -भुजबळ

Next

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असो की, फडणवीस सरकार आम्ही मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. मात्र, मराठा समाजातील काही नेते म्हणतात की, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे. कोणी म्हणतंय आम्ही ओबीसीच नाही, त्यांना बाहेर काढा आणि मराठ्यांना ओबीसीत घ्या. अशा परिस्थितीत संघर्ष निर्माण होण्यासारखे वातावरण आहे. आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल, तर लढावेच लागेल. महात्मा फुलेंनी आपल्याला लढायला शिकवले. त्यासाठीची प्रेरणा आज इथून घेऊन जायचे आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

आज ५४ टक्के ओबीसी आहेत, असे सांगून भुजबळ म्हणाले की, आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये; पण मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य असतात. ते अडचणी आणतात. मराठा आरक्षणला पाठिंबा असूनही हा विषय वेगळ्या दिशेने सरकत असेल, तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल.

जातीच्या भांडणातून बाहेर पडणार का?

दगडूशेठ गणपतीसमोर १० हजार महिला एकत्र येऊन एकसुरात अथर्वशीर्ष म्हणतात. ही चांगली गोष्ट आहे; पण त्यातील एकीलाही असं वाटत नाही? की तिथून पुढेच भिडेवाडा आहे. जिथे महिलांची पहिली शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली. ते आपलं प्रेरणास्थळ आहे. जात आणि राजकारणासाठी भांडणे केली जातात. त्यातून आपण बाहेर पडणार की नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला.

-------

कोरोनाबाबत भ्रमात राहू नका

कोरोना होणार नाही. या भ्रमात कुणीही राहू नका. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कोरोना होऊ शकतो. कोविड-१९ वर अजून लस यायची आहे; पण सध्यातरी मास्क हीच आपली लस आहे, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

Web Title: ... then we have to fight for OBC reservation - Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.