...तर तुम्हाला ४९ हजार रुपये चार्जेस पडतील" क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या नादात गमावले दीड लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 05:37 PM2022-08-07T17:37:26+5:302022-08-07T17:37:33+5:30
कार्डवरील सर्व्हिसेस डि अॅक्टीव्ह करण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक
पुणे : शिक्षिका असलेल्या महिलेने खर तर क्रेडिट कार्डचा कधी वापर केला नव्हता. सायबर चोरट्या महिलेने त्या क्रेडिट कार्डवर २ सर्व्हिसेस अॅक्टीव्ह झाल्या असल्याचे सांगून त्याचे ४९ हजार चार्जेस लागतील, ते पडू नये, म्हणून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन दीड लाख रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी आंबेगाव येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ मार्च २०२२ रोजी घडला होता. बँका तसेच पोलीस सातत्याने आपला पासवर्ड किंवा ओटीपी कोणाला सांगू नका असे सांगत असतात. मोबाईलवर बँका मेसेज पाठवत असतात. मात्र, प्रत्यक्ष अशी घटना तुमच्यासमोर आली तर या सर्व बाबी बहुतांश सुशिक्षित विसरुन जातात अन सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात. फिर्यादी महिला शिक्षिकेच्या बाबतीतही असेच घडले.
फिर्यादी यांचे पती सॉफ्टवेर कंपनीत नोकरी करतात. त्यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आय सी आय सी बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड घेतले होते. मात्र, त्याचा वापर कधी केला नव्हता. ४ मार्च रोजी त्यांना आय सीआय सीआय बँकेतून बोलत असल्याचा एका महिलेचा फोन आला. तुमच्या क्रेडिट कार्डवर दोन सर्व्हिसेस अॅक्टीव्हेट झाल्या आहेत. त्या सर्व्हिसेस डी अॅक्टीव्हेट केल्या नाहीतर तर तुम्हाला ४९ हजार रुपये चार्जेस पडतील, अशी भिती दाखवली. आपल्याला ४९ हजार रुपये भरायला लागू नये, म्हणून ती महिला सांगेल, त्याप्रमाणे फिर्यादी कृती करीत गेल्या. तिने या सर्व्हिसेस डी अॅक्टीव्हेट करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर पाठविलेला एक कोड सांगा असे सांगितले. त्यांनी मेसेजमधील कोड तिला सांगितला. त्यानंतर तिने फिर्यादी यांना आय मोबाईल अॅप्लीकेशन उघडण्यास सांगितले. त्यासाठी कोणतेही चार्जेस पडणार नाहीत, असे म्हणाल्यावर फिर्यादी यांनी मोबाईलमधील आय मोबाईल अॅप्लिकेशन उघडून ती महिला सांगेल, त्याप्रमाणे स्टेपस करत गेल्या. त्यानंतर त्यांना त्याचवेळी आय सी आय सी बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डची माहिती विचारल्यानंतर त्यांनी त्यावर विश्वास ठेवून सर्व माहिती दिली. त्यानंतर १० ते १५ मिनिटात त्यांच्या मोबाईलवर ९९ हजार १४४ व ५० हजार ८२२ रुपये क्रेडिट कार्डवरुन कट झाल्याचे मेसेज आले. त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दिली. त्याचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करीत आहेत.