युवकांसाठीही साहित्य संमेलन हवे
By admin | Published: October 14, 2015 03:34 AM2015-10-14T03:34:09+5:302015-10-14T03:34:09+5:30
जगभरात विखुरलेल्या मराठी लोकांना जोडण्यासाठी प्रवासी भारतीय दिवसाच्या धर्तीवर ‘प्रवासी मराठी दिवस’ साजरा करण्याच्या सूचनेचा पुनरुच्चार करतानाच
पुणे : जगभरात विखुरलेल्या मराठी लोकांना जोडण्यासाठी प्रवासी भारतीय दिवसाच्या धर्तीवर ‘प्रवासी मराठी दिवस’ साजरा करण्याच्या सूचनेचा पुनरुच्चार करतानाच युवा शक्तीला मराठी भाषासंवर्धनाच्या कार्यात जोडण्यासाठी युवा साहित्य संमेलन सुरू करा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मंगळवारी केली.
जानेवारीत पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल
भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्या वेळी ते बोलत होते. ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति।’ या वचनाचा आधार घेऊन साहित्यिकांनी विचारस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य व श्रद्धास्वातंत्र्याचा आदर करणाऱ्या आपल्या थोर परंपरेचे जतन व संवर्धन केले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन राज्यपालांनी केले.
देशात दिवाळी एकदाच साजरी होते; मात्र महाराष्ट्रात साहित्य संमेलन दिवाळीइतक्याच उत्साहात साजरे होते, हा मराठी भाषेचा गौरव असल्याचे विद्यासागर राव यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडची ओळख आतापर्यंत औद्योगिक नगरी, सांस्कृतिक नगरी व पेन्शनरांचे शहर अशी होती. साहित्य संमेलनामुळे मात्र शहराची ओळख साहित्यनगरी म्हणून निर्माण होईल, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचे स्वागतपर भाषण झाले, तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)