भुसार बाजारातील व्यवहारावरही आता वेळेची मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:08+5:302021-04-22T04:11:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मर्यादित ग्राहक आणि कमी वेळेत त्या त्या दिवशीचा बाजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डातील कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मर्यादित ग्राहक आणि कमी वेळेत त्या त्या दिवशीचा बाजार चालविण्यावर बाजार समिती प्रशासनाने भर दिला आहे. यासाठी आता गूळ-भुसार विभाग सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेतच सुरू राहणार आहे. याआधी सकाळी ८ ते सायंकाळी ६ यावेळेत भुसार बाजार सुरू होता. गर्दी टाळण्यासाठी या विभागातील व्यवहाराची वेळ कमी केल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, केळी, फुले आदी विभागांतील व्यवहाराची वेळ पहाटे ३ ते दुपारी १ अशी निश्चित केली आहे. तसेच भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ विभाग बाह्य पाकळ्या आणि अंतर्गत पाकळ्या दिवसाआड सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे या विभागातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात बाजार प्रशासनाला यश आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी भुसार विभागातील व्यवहाराची वेळ कमी केली आहे.
--
बाजरात पासशिवाय प्रवेश नाही, किरकोळ व डमी विक्रेत्यांवर बंदी घातली आहे. परिणामी गर्दी कमी झाली आहे. रिक्षाला बंदी, मार्केट यार्डात येणारे सर्व रस्ते बॅरिकेड्सने अडविले आहेत. माल घेऊन येणाऱ्या तसेच माल घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या गेटने प्रवेश दिला जात आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
- मधुकांत गरड, मुख्य प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
--
८२६ वाहनांतून बाजारात आवक
भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागात ८२६ वाहनांतून भाज्या, कांदा-बटाटा आणि फळांची बुधवारी आवक झाली. १७ हजार ७८८ क्विंटल माल बाजारात विक्रीसाठी आला होता. तर कांद्याची ४ हजार ५३० क्विंटलची आवक झाली. कडक निर्बंध असले, तरी बाजारात विक्रमी आवक होत आहे. योग्य नियोजनामुळे बहुतांश मालाची विक्रीही होत आहे.
- बाबासाहेब बिबवे, फळबाजार विभागप्रमुख
--
मार्केट यार्डात प्रशासकांनी केलेल्या नियमांची, तसेच सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. गर्दी नियंत्रणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवकही चांगली होत आहे. मात्र, काटेकोर अंमलबजावणीमुळे गर्दीमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
- दत्तात्रय कळमकर, भाजीपाला विभागप्रमुख