कुख्यात गजा मारणे टोळीवर ११६ गुन्हे
By admin | Published: December 3, 2014 03:07 AM2014-12-03T03:07:14+5:302014-12-03T03:07:14+5:30
शहरामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाला तोंड फुटले असून पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे
पुणे : शहरामध्ये पुन्हा एकदा टोळी युद्धाला तोंड फुटले असून पोलिसांनी संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. कुख्यात गजा मारणे टोळीविरुद्ध गेल्या आठ ते दहा वर्षात ११६ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
गजा मारणेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध असलेल्या गुन्ह्यांची सद्यस्थिती पोलिसांकडून तपासली जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजा मारणेच्या फार्महाऊसवर छापा टाकून त्याची मोटार ताब्यात घेतल्याचे सह पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले.गजा मारणेला किती केसेसमध्ये जामीन मिळाला आहे व तो किती गुन्ह्यांत फरार आहे याची माहिती काढायला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये याच्याविरुद्ध वॉरंट बजावण्यात आलेले असेल त्यामध्ये त्याला अटक करण्यात येणार आहे. टोळीच्या कोणकोणत्या सदस्यांवर एमपीडीएची कारवाई करता येईल याचा अभ्यास सुरु आहे. यासोबतच शहरातील अन्य टोळ्यांमधील सक्रीय सदस्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
या टोळीतील गुंडांचा पुर्वेतिहास आणि गुन्ह्यांची माहिती काढून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या शहरामध्ये १५ पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असल्या तरी गजा मारणे आणि घायवळ टोळी सोडल्यास अन्य टोळ्या शांत आहेत. याच दोन टोळ्यांनी शहरात धुमाकुळ घातला असून या टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे. त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष असल्याचेही कुमार म्हणाले. अत्यंत आक्रमकपणे पोलिसांची कारवाई सुरु होणार असून टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी बाह्या मागे सारल्या आहेत. (प्रतिनिधी)